wrestler protest : आंदोलन न करणाऱ्या कुस्तीपटूंची ‘साई’ केंद्र सुरू करण्याची मागणी

wrestler protest : आंदोलन न करणाऱ्या कुस्तीपटूंची ‘साई’ केंद्र सुरू करण्याची मागणी

नवी दिल्ली : बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे भारतातील कुस्ती ठप्प झाली असून आगामी स्पर्धांच्या तयारीवर याचा परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमवर आंदोलनात सहभागी न होणाऱ्या कुस्तीपटूंनी साई केंद्र (Sports Authority of India) सुरू करण्याची मागणी केली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंपैकी महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी पॉस्कोसह विविध कलमे लावत गुन्हा दाखल केला, मात्र त्यांना अटक झालेली नाही आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू ठेवले आहे. पण याचा फटका आंदोलनात सहभागी न झालेल्या कुस्तीपटूंना बसत आहे. आगामी स्पर्धांच्या तयारीवरही परिणाम होत असल्यामुळे साई केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला सरावाची गरज असल्याचेही कुस्तीपटूंनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटू नरसिंग यादव म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी दोन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर राष्ट्रीय शिबिराला सुरुवात होण्याची गरज आहे. यासाठी साई केंद्र खुले करावे, जेणेकरून ज्युनियर कुस्तीपटूंना या आंदोलनाचा फटका बसायला नको.

लैंगिक शोषणाप्रकरणी कुस्तीपटूंना न्याय मिळावा
जंतरमंतरवर करणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मिळायला हवा, असे स्पष्ट मत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट कमिशनचे सदस्य प्रकाश करहाना यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, माझे वैयक्तिक मत आहे, मी कमिशनच्या वतीने बोलत नाही. लैंगिक शोषण हा गंभीर विषय आहे आणि महिला कुस्तीपटू आपल्या हक्कासाठी लढत आहेत. भारतात अशा घटना घडल्यास भविष्यात मुली खेळांकडे वळणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कुस्तीपटूंना न्याय मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

साई केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून मौन
आशियाई चॅम्पियनशिप होऊन आता बराच कालावधी उलटून गेला आहे, त्यामुळे राष्ट्रीय शिबिर सुरू होण्याची गरज असल्याचे ग्रीको रोमन प्रकाराचे प्रशिक्षक हरगोबिंद सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, साई केंद्राच्या अधिकाऱ्यांना केंद्र कधी सुरू होणार याबाबत विचारले असता, त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मिळत नाही आहे. तसेच साई केंद्राचे संदीप प्रधान यांच्याकडूनही मौन बाळगण्यात आले आहे.
याशिवाय ग्रीको रोमन (८२ किलो वजनी गट) प्रकारात सहभागी होणारा संदीप देशवालनेही सांगितले की, राष्ट्रीय शिबीर बंद असल्यामुळे सरावावर परिणाम होत आहे. शिबीराबाबत प्रशिक्षकांना विचारले असता त्यांनाही कधी सुरू होणार याबाबत माहीत नसल्याचे त्याने सांगितले.

 

First Published on: May 3, 2023 10:43 AM
Exit mobile version