WTC Final : भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा; जाडेजा, अश्विन दोघांनाही संधी

WTC Final : भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा; जाडेजा, अश्विन दोघांनाही संधी

रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा

न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ कोणत्या गोलंदाजांना संधी देणार, याबाबत मागील काही दिवसांत बरीच चर्चा सुरु होती. मात्र, भारताने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच ‘प्लेइंग इलेव्हन’ची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार असून डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. भारताने १५ जूनला अंतिम सामन्यासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यापैकी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज, तसेच यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि फलंदाज हनुमा विहारी यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही.

अनुभवी तेज त्रिकुटाची निवड

भारताने या सामन्यासाठी अश्विन आणि जाडेजा या फिरकी जोडगोळीसह ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी तेज त्रिकुटाची निवड केली आहे. तसेच रिषभ पंत यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करणार असून चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज मधल्या फळीत खेळतील.

भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

 

First Published on: June 17, 2021 8:16 PM
Exit mobile version