WTC Final : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा पहिला दिवस जाणार पावसामुळे वाया? 

WTC Final : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा पहिला दिवस जाणार पावसामुळे वाया? 

पावसामुळे पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जराही खेळ होणार नाही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात कसोटीचा ‘वर्ल्डकप’ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे खेळ बरेचदा थांबवावा लागू शकेल असे म्हटले जात आहे. त्यातच सामना सुरु होण्याला आता एका तासाहूनही कमी शिल्लक असून साऊथहॅम्पटन येथे रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जराही खेळ होणार नाही. युके मेट डिपार्टमेंटच्या मते, आजच्या दिवशी साऊथहॅम्पटन येथे बराच काळ मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु, या सामन्याच्या पाच दिवसांत पाऊस झाल्यास सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

सहावा दिवस राखीव 

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ मागील काही दिवस साऊथहॅम्पटन येथे सराव करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार असून २३ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पावसामुळे वेळ वाया गेल्यास सहाव्या दिवशी सामना होईल. परंतु, सहा दिवसांच्या खेळानंतरही सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत संपल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या जेतेपद देण्यात येईल.

भारताने केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा 

भारताने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. भारताने या सामन्यासाठी अश्विन आणि जाडेजा या फिरकी जोडगोळीसह ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी तेज त्रिकुटाची निवड केली आहे. तसेच रिषभ पंत यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करणार असून चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज मधल्या फळीत खेळतील.

 

First Published on: June 18, 2021 2:38 PM
Exit mobile version