WTC Final : पंत, जाडेजाची झुंजार फलंदाजी; सहाव्या दिवशी लंचपर्यंत भारताला ९८ धावांची आघाडी

WTC Final : पंत, जाडेजाची झुंजार फलंदाजी; सहाव्या दिवशी लंचपर्यंत भारताला ९८ धावांची आघाडी

रिषभ पंतची झुंजार फलंदाजी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सध्या रंगतदार स्थितीत आहे. पहिले चार दिवस झालेल्या पावसामुळे हा सामना राखीव दिवशी खेळवावा लागत आहे. सहाव्या दिवशी भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली होती. परंतु, रिषभ पंत आणि रविंद्र जाडेजा या डावखुऱ्या फलंदाजांच्या झुंजार खेळींमुळे सहाव्या दिवशी लंचच्या वेळी भारताची दुसऱ्या डावात ५ बाद १३० अशी धावसंख्या होती. भारताकडे ९८ धावांची आघाडी होती. पंत ४८ चेंडूत चार चौकारांसह २८ धावांवर, तर जाडेजा २० चेंडूत दोन चौकारांसह १२ धावांवर नाबाद होता. त्यामुळे पुढील दोन सत्रांमध्ये हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

जेमिसनने केले कोहली, पुजाराला बाद  

भारताने सहाव्या दिवशी २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताकडे ३२ धावांची आघाडी होती. कर्णधार विराट कोहली फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला १३ धावांवर कायेल जेमिसनने बाद केले. जेमिसननेच मग चेतेश्वर पुजाराला (१५) माघारी पाठवले. पहिल्या डावात ४९ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला दुसऱ्या डावात चांगला खेळ करता आला नाही. रहाणेला १५ धावांवर ट्रेंट बोल्टने यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद केले. यानंतर मात्र पंत (नाबाद २८) आणि जाडेजा (नाबाद १२) यांनी भारताचा डाव सावरला. त्यामुळे सहाव्या दिवशी लंचपर्यंत भारताकडे ९८ धावांची आघाडी होती.

First Published on: June 23, 2021 5:33 PM
Exit mobile version