Yuvraj singh: मी परत येतोय ! सिक्सर किंग युवराज सिंगची घोषणा

Yuvraj singh: मी परत येतोय ! सिक्सर किंग युवराज सिंगची घोषणा

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. त्याने आपल्या चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये सक्रिय होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर इन्स्टाग्राम पोस्ट करत दिली. आपण कधी क्रिकेटमध्ये सहभागी होणार आहे याचा देखील त्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. पण तो कोणत्या मालिकेत अथवा कोणत्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती अद्याप दिली नाही. त्यामुळे त्याच्या या पोस्टची क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून युवराज सिंगची जगभर ओळख आहे. अशातच त्याने केलेल्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

पोस्टमध्ये युवराज सिंग म्हणतो……

“तुमच्या नशीबाचे सर्व काही देव लिहत असतो. पण मी माझ्या चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन येणाऱ्या फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी मला आशा आहे. याहून जास्त माझ्यासाठी आनंदाच काय असू शकत नाही. तुम्ही सर्व चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा मी आभारी असून पुढील काही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाचे असेच समर्थन करत रहा. कारण एक खरा क्रिकेटप्रेमी चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!, अशी माहिती युवराजने सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली.

युवराज सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. ती व्हिडीओ २०१७ मधील आहे. जेव्हा युवराजने इग्लंडविरूध्दच्या सामन्यात १५० धावांची विक्रमी खेळी केली होती. त्या सामन्यात युवराजने १२७ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १५० धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. त्याच सामन्यात धोनीने १२२ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या. युवराजने आपण फेब्रुवारीत परतणार असल्याचे सांगितले आहे. पण त्याने कोणत्या मालिकेत अथवा कोणत्या संघात खेळणार याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. तर युवराज रस्ते सुरक्षा मालिकेत खेळू शकतो अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. गेल्या वेळेसही युवराज या मालिकेत खेळला होता. या मालिकेत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू पहायला मिळतात.


हेही वाचा – T20 world cup 2021: मॉर्गन बनला टी २० आंतरराष्ट्रीय मधील सर्वात यशस्वी कर्णधार; धोनी, असगरला टाकले मागे

First Published on: November 2, 2021 2:54 PM
Exit mobile version