युवराज सिंग ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत खेळण्यास उत्सुक!

युवराज सिंग ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत खेळण्यास उत्सुक!

युवराज सिंग

भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग ऑस्ट्रेलियातील टी-२० स्पर्धा ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळण्यास उत्सुक आहे. २०११ एकदिवसीय विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या युवराजने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो परदेशातील विविध स्पर्धांमध्ये खेळत असून त्याला आता बिग बॅश लीगमध्ये खेळायचे आहे. या स्पर्धेतील एखाद्या संघात त्याचा समावेश व्हावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याची मदत करत असल्याचे समजते.

भारतीय क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळलेला नाही

बीसीसीआयच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला परदेशातील टी-२० लीग खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे याआधी भारताचा एकही पुरुष क्रिकेटपटू बिग बॅश लीगमध्ये खेळलेला नाही. मात्र, ३८ वर्षीय युवराजने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र, भारताकडून ३०४ एकदिवसीय, ५८ टी-२० आणि ४० कसोटी सामने खेळलेल्या युवराजला परदेशातील टी-२० स्पर्धांत चांगली कामगिरी करता आलेली नाही.

…तर स्पर्धेचा दर्जा वाढेल 

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रातील माहितीनुसार, युवराजला संघात समाविष्ट करुन घेण्यास बिग बॅश लीगमधील आठही संघांनी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. भारतीय क्रिकेटपटूंच्या समावेशाने बिग बॅश लीगचा दर्जा वाढेल असे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या असोसिएशनचा अध्यक्ष शेन वॉटसनला वाटते. त्यामुळे युवराज यंदा या स्पर्धेत खेळताना दिसू शकेल.

First Published on: September 8, 2020 8:05 PM
Exit mobile version