मुंबई पाठोपाठ ठाण्यातही उद्या महिलांसाठी विशेष कोरोना लसीकरण सत्र

मुंबई पाठोपाठ ठाण्यातही उद्या महिलांसाठी विशेष कोरोना लसीकरण सत्र

मुंबई पाठोपाठ सोमवारी ठाणे शहरातील महिलांना सुलभरीत्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता ठामपा शाळा क्र. १२, टेंभी नाका येथे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते तसेच इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच पाच ठिकाणी महिलांसाठी विशेष सत्र बारा तास सुरू राहणार आहे.

ठामपाने शहरात सकाळी ११.०० ते ४.०० दुपारी या वेळेत व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु या वेळेत शहरातील काही महिलांना लस घेणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी दोन सत्रात विशेष लसीकरण आयोजित करण्याचा निर्णय महापौर व महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने ठामपा शाळा क्र. १२ टेंभी नाका, ग्लोबल कोव्हिड सेंटर, पार्किग प्लाझा कोव्हिड सेंटर, भाईंदरपाडा कोव्हिड सेंटर व कौसा स्टेडियम या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत ‘’विशेष लसीकरण सत्र’ आयोजित करण्यात आले आहे.तरी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान,  मुंबई महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत सर्व घटकांसोबतच महिलांसाठीही १७ सप्टेंबर रोजी विशेष लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार सरकारी, पालिका व खासगी लसीकरण केंद्रांवर एका दिवसात तब्बल १ लाख २७ हजार ३५१ महिलांनी घेतला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आरोग्य यंत्रणा व जनसंपर्क खाते यांच्यामार्फत देण्यात आली आहे.


First Published on: September 19, 2021 10:57 PM
Exit mobile version