काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री घेणार शपथ; वाचा यादी!

काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री घेणार शपथ; वाचा यादी!

राज्य मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे मिळून ३० हून अधिक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दुपारी एक वाजता हा शपथविधी होणार असून त्यासाठी तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. काल संध्याकाळपर्यंत कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी द्यायची, यावर संभ्रम असलेल्या काँग्रेस पक्षाने अखेर रात्री उशिरा आपल्या मंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, के. सी. पडवी यांचा समावेश आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने तरुण नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. एकूण १० मंत्र्यांच्या या यादीमध्ये ८ कॅबिनेट मंत्री तर २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेचा पर्याय पाहात असल्याची चर्चा असणारे काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम शेख यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे!

काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी

वर्षा गायकवाड यांनाही कॅबिनेट मंत्रीपद

या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यंमत्र्यांना सरकारमध्ये कसं सामावून घेतलं जाणार? यावर चर्चा सुरू होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांनी याआधीच आपण मंत्री बनणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे त्यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यासोबतच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्याशिवाय, मुंबईतील ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड यांची देखील कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. विश्वजीत कदम आणि सतेज पाटील या दोघांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.


हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीचे भाजपला निमंत्रणच नाही!

काँग्रेससोबतच राहण्याचं फळ?

दरम्यान, अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी अगदी शेवटपर्यंत अस्लम शेख हे पक्षांतरासाठी भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विशेषत: शिवसेनेत जाण्यासाठी अस्लम शेख इच्छुक होते. मात्र, त्यांचा मालाड पश्चिम हा मतदारसंघ जागावाटपात भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांनी काँग्रेसमधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलं जात होतं. अखेर त्यांना काँग्रेसमध्येच राहण्याचं फळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

First Published on: December 30, 2019 9:11 AM
Exit mobile version