अमित शहांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेचे शक्तीप्रदर्शन

अमित शहांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेचे शक्तीप्रदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी भगवान भक्तीगड सावरगाव घाट येथे होणार्‍या मेळाव्यात किमान आठ ते दहा लाख लोकांचा जनसमुदाय जमण्याची शक्यता आहे. सध्या या परिसराचा ताबा केंद्रीय गृहखाते, गुप्तचर खात्याने घेतला. येथे येणार्‍या नागरिकांना सभेच्या ठिकाणी किमान दोन तास आधी पोहोचण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

दसरा मेळाव्यास महाराष्ट्र आणि केंद्रातील 18 ते 20 मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्यातील अनेक खासदार, मंत्री, विविध गडाचे महंत, विविध महामंडळाचे अध्यक्ष, उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, मंत्री महादेव जानकर, जयकुमार रावल, संजय कुटे, हरीभाऊ बागडे, राम शिंदे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर, अतुल सावे यांची नावे आहेत. याशिवाय इतरही अनेकजण उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यामुळे गृहविभागाला आणि राज्याच्या पोलिसांना सुरक्षेचा मोठा ताण पडणार आहे.

अमित शहा हे एक वाजता भगवान भक्तीगडावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गोपीनाथगडावरून सकाळी साडेसहा वाजता रॅली भगवान भक्तीगडाच्या दिशेने रवाना होणार आहे. तिथे 10 वाजता रॅली पोहोचणार असून समर्थकांनी वेळेत पोहोचावे असे आवाहन पंकजाताई यांच्या प्रसिध्दी विभागाकडून करण्यात आले आहे.

First Published on: October 8, 2019 5:31 AM
Exit mobile version