बंधूप्रेमासोबत मनसेने मैत्रीही जपली

मनसे

भायखळा विधानसभा मतदार संघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्ज भरला नाही. नांदगावकरच नाही तर मनसेच्या कोणताही उमेदवार या मतदार संघातून रिंगणात उतरला नाही. शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची पत्नी या मतदार संघातून निवडणूक लढवत असून यशवंत जाधव आणि बाळा नांदगावकर यांची घट्ट मैत्री होती. या मैत्रीला जपतच मनसेच्यावतीने उमेदवारी न दिल्याची चर्चा सध्या भायखळा मतदार संघात ऐकायला मिळत आहेत.

भायखळा मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्यासह काँग्रेस आघाडीचे मधु अण्णा चव्हाण, अभासेच्या गीता गवळी, विद्यमान आमदार एमआयएमचे वारीस पठाण, बसपाचे कृपाशंकर जयस्वार, अपक्ष एजाज खान आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. परंतु या मतदार संघातून मनसेचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेला नाही. या मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संजय नाईक आणि समिता नाईक यांनी अर्ज घेतले होते. परंतु शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेच्यावतीने कुणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता.

या मतदार संघातून सपाचे रईस शेख हे इच्छुक होते. परंतु एमआयएमचे वारीस पठाण यांना आव्हान ठरू नये तसेच मुस्लिम मतांची विभागणी होऊ नये म्हणून सपाने या ठिकाणी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे सपाचे रईस शेख यांना भिवंडीत जावे लागले. परंतु मुस्लिम मतांची विभागणी होऊ नये म्हणून सपा आणि एमआयएमने समझोता केल्याची बाब लक्षात येताच मनसेनेही या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिल्यास मराठी व पर्यायाने हिंदु मतांची विभागणी होईल आणि परिणामी पुन्हा पाच वर्षे एमआयएमच्या वारिस पठाण यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल, याच कारणामुळे या ठिकाणी मनसेने उमेदवार दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यशवंत जाधव आणि बाळा नांदगावकर हे मित्र असल्याने वाहिनींच्या आमदारकीसाठी मनसेने मैत्रीधर्म पाळत याठिकाणी उमेदवार दिला नसल्याचेही बोलले जात आहे. वरळीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर उमेदवार न देता मनसेने कुटुंबस्नेह जपण्याचा प्रयत्न केला होता, त्यापाठोपाठ भायखळ्यातून उमेदवार न देता मैत्री जपल्याचेही जोरदार चर्चा आहे.

मुस्लिम आमदारापैकी मराठी आमदार बरा, असे म्हणत मनसेने याठिकाणी उमेदवार दिला नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे अभासेच्या गीता गवळी, काँग्रेसचे मधु चव्हाण, शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि एमआयएमचे वारिस पठाण यांच्या चौरंगी लढत होणार आहे.

First Published on: October 6, 2019 5:58 AM
Exit mobile version