आता नारायण राणेही म्हणतात ‘आमचं ठरलंय’! ८ दिवसांत भाजपमध्ये जाणार!

आता नारायण राणेही म्हणतात ‘आमचं ठरलंय’! ८ दिवसांत भाजपमध्ये जाणार!

नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सर्वच ठिकाणी युतीबद्दल निश्चित काहीही न सांगता फक्त ‘आमचं ठरलंय’ एवढंच बोलत आहेत. तर आता भाजपच्या वाटेवर डोळे लावून बसलेले नाराणय राणे यांनी देखील पत्रकारांना ‘आमचं ठरलंय’ असं सांगत बुचकळ्यात टाकलं आहे. ‘युती झाली किंवा न झाली, त्याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. माझं बोलणं थेट भाजप नेते आणि मुख्यमंत्र्यांशी झालंय’, असं नारायण राणे म्हणाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या विरोधाचं भाजप काय करणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप प्रवेशाविषयी पत्रकारांशी संवाद साधला.

येत्या ८ दिवसांत भाजपप्रवेश

दरम्यान, ‘माझा भाजप प्रवेश कधी होईल हे माहीत नाही, पण येत्या ८ दिवसांत तो होईल’, असं नारायण राणे म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. तेच प्रवेश देणार. तेच तारीख सांगतील. युती होईल की नाही हा माझा विषय नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना सोडली, तेव्हाही ते माझ्यासोबत होते, काँग्रेस सोडली, तेव्हाही ते माझ्यासोबत होते. त्यामुळे आता भाजपमध्ये देखील ते माझ्यासोबत जातील’, असं राणे म्हणाले.


हेही वाचा – नारायण राणे भाजपत आले, तर भाजप पदाधिकारी शिवसेनेत जाणार!

‘कोकणात भाजपचे आमदार-खासदार असतील’

यावेळी बोलताना राणेंनी कोकणात शिवसेना मी वाढवली असं सांगत शिवसेनेला डिवचलं. ‘मी शिवसेना कोकणात आणली. काँग्रेसमध्ये आलो, तेव्हा इथे काँग्रेसचे आमदार-खासदार निवडून आले. आता भाजपने प्रवेश दिला तर पुढच्या वेळी जिल्ह्यात भाजपचे आमदार-खासदार दिसतील’, असं राणे म्हणाले.

‘शिवसेनेच्या भूमिकेची दखलही घेत नाही’

नाणारविषयी शिवसेनेने बदललेल्या भूमिकेविषयी विचारलं असता, ‘माझा त्यांच्या बदललेल्या भूमिकेशी संबंध नाही. मी त्यांच्या भूमिकेची दखलही घेत नाही. दर तासाला ते भूमिका बदलतात. कालच रावते म्हणाले की १४४ जागा शिवसेनेला मिळाल्या नाहीत, तर आम्हाला युती नको..मग त्याबद्दल त्यांना विचारा ना’, असं राणे म्हणाले. ‘नाणारविषयी मी भाजपमध्ये गेल्यावर भूमिका जाहीर करेन. एवढी घाई का आहे?’ असं देखील ते म्हणाले.

First Published on: September 19, 2019 7:51 PM
Exit mobile version