घरमहाराष्ट्रनारायण राणे भाजपत आले, तर भाजप पदाधिकारी शिवसेनेत जाणार!

नारायण राणे भाजपत आले, तर भाजप पदाधिकारी शिवसेनेत जाणार!

Subscribe

नारायण राणे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा जोर पकडू लागताच भाजपमधल्या राणेविरोधी गटांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे जर राणेंचा भाजपा प्रवेश झाला, तर कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘राणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अस्वस्थ झाले असून, काही पदाधिकाऱ्यांनी ‘जर राणे भाजपात आले तर आमचे ठरले’, असे सांगत ‘आम्ही शिवसेनेत जाऊ’ असे खासगीत बोलताना सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत.

भाजपा पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘राणेंना भाजपामध्ये घेऊ नका’ अशी विनंती निवेदनातून करणार आहेत. तसेच ‘जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाहीत ते भाजपाचे काय होणार?’ असे देखील या निवेदनातून भाजपा पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत. याआधी देखील राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवेळी या पदाधिकाऱ्यांनी ‘राणेंना भाजपामध्ये घेऊ नका’, असे सांगत राणेंचा पक्ष प्रवेश थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता देखील राणेंना भाजपामध्ये न घेण्यासाठी हे पदाधिकारी मोर्चे बांधणी करत आहेत.

- Advertisement -

जठार, तेली, पारकरांची शिवसेनेशी जवळीक वाढली

राणेंनी आपण येत्या १० दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या या व्यक्तव्यानंतर राणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे असे वक्तव्य केल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेनेशी जवळीक वाढली असून, हे सर्व नेते हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत हे या नेत्यांनी शिवसेनेत यावे यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

म्हणून राणेंना त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांचा विरोध

खरंतर राणे यांच्या भाजपा प्रवेशाला एकेकाळचे त्यांचेच जुने सहकारी आणि आता भाजपामध्ये असलेल्या नेत्यांचा विरोध आहे. राणेंसोबत आणि त्यांच्या मुलांसोबत आम्हाला पुन्हा काम करायची इच्छा नसून, त्यांना मुख्यमंत्री भाजपामध्ये घेणार नाहीत असा विश्वास राणेंच्या या जुन्या सहकाऱ्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना बोलून दाखवला. तसेच आता राज्यात युती गुण्या गोविंदाने नांदत असून, त्यात असा खोडा नको, असे देखील या नेत्यांनी सांगितले.

आमचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला विरोध आहे. तसेच मुख्यमंत्री, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दुखावतील असा कोणताच निर्णय घेणार नाही. तसेच नारायण राणे हे कधीच एका पक्षात टिकत नाहीत. ज्या भाजपाने त्यांना खासदारकी दिली, त्यांनी त्याच भाजपावर टीका केली. राणे हे आता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी भाजपात येण्याचा प्रयत्न करत आहेत.

संदेश पारकर, भाजपा नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -