शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपाल भेट तूर्तास स्थगित

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपाल भेट तूर्तास स्थगित

उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे शिष्टमंडळ आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांची ही भेट तूर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ही भेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत जरुरीचे आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे शिष्टमंडळ एकत्र येऊन राज्यपालांची भेट घेणार होते. तिथे ते राज्यपालांना शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती करणार आहेत.


हेही वाचा – घोडेबाजार भरवण्याचे भाजपाचे मनसुबे; सामना अग्रलेखातून जहरी टीका


…म्हणून शिष्टमंडळाची भेट पुढे ढकलली

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाची भेट पुढे ढकलल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या प्रसिद्धीपत्रात त्यांनी शिष्टमंडळाची बैठक पुढे का ढकलण्याती आली? त्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. ‘तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणुक आयोगाकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे राज्यपाल महोदय यांची आमची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे’, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – संजय राऊत यांनी केली ‘ही’ शायरी ट्विट; म्हणाले ‘याद मुझे दर्द पुराने नही आते’!


राज्यपाल भेटीनंतर सत्तापेच सूटणार?

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन २२ दिवस उलटून गेले मात्र राज्यात अद्यापही स्थिर सरकार होऊ शकलेले नाही. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक जागा जिंकून येणाऱ्या भाजप पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, भाजप पक्ष दिलेल्या कालावधीत सत्ता स्थापन करु शकला नाही. त्यानंतर शिवसेनेलाही राज्यपालांनी संधी दिली. मात्र, शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना अपयश ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाला संधी दिली. मात्र, राष्ट्रवादीने देखील अधिक वेळ मागितला. अखेर वस्तुस्थिती पाहता राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटू लागू करण्याचे शिफारस पत्र दिल्लीला पाठवले. दिल्लीतून राष्ट्रपतींनी त्यांचे ते शिफारस पत्र मान्य केले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सध्या भाजप पक्ष एकटा पडला असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जर या तिन्ही पक्षाच्या शिष्टमंडळाने एकत्र भेट घेतली तर ते सत्ता स्थापनेचा दावा देखील करु शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


हेही वाचा – चंद्रपूर, नाशिकमधील भाजप नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले

First Published on: November 16, 2019 3:49 PM
Exit mobile version