शिवसेनेच्या बंडखोराला शिवसैनिकांचं बळ; पक्षप्रमुखांची शिक्षा मान्य!

शिवसेनेच्या बंडखोराला शिवसैनिकांचं बळ; पक्षप्रमुखांची शिक्षा मान्य!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांना कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतरही कल्याण पूर्व मतदार संघात बंडखोरी उफाळून आली आहे. मात्र पक्षप्रमुख जी शिक्षा देतील ती शिक्षा आम्हाला मान्य असेल, अशी कबुली बंडखोर धनंजय बोडारे यांनी दिली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात बोडारे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र, यावेळी सेनेतील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे बंडखोराला शिवसैनिकांचे बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – राज्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार पुण्यात, हिंगोलीत सर्वात कमी

तेव्हा आमची बाजू शिवसेना पक्ष प्रमुखांसमोर ठेवू

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात युतीकडून भाजपाचे गणपत गायकवाड उमेदवार आहेत. गायकवाड हे गेल्या दोन वेळापासून या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा शिवसेनाला सोडण्याची मागणी केली होती. मात्र ही जागा भाजपाला सोडण्यात आल्याने शिवसेनेत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी युतीचे अधिकृत भाजपाचे उमेदवार गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. बोडारे यांच्या निवडणूक कार्यालायचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. शहर संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पलांडे, नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, माधुरी काळे, शितल मंडारी, सारिका जाधव एवढेच नाही तर भाजप चे नगरसेवक विशाल पावशे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोडारे यांनी सांगितले की, “पक्ष प्रमुख व पालकमंत्री आम्हाला जी काही शिक्षा देतील. ती शिक्षा मान्य असेल. आमची बाजू त्यावेळी आम्ही त्यांच्या समोर ठेवू”, असे ते म्हणाले. त्यामुळे बंडखोरांना सेनेकडून काय शिक्षा केली जाते? हेच पाहावे लागणार आहे.

First Published on: October 8, 2019 6:33 PM
Exit mobile version