हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2024 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील संक्रांतीला ववसा घेण्याच्या प्रथेसोबतच लहान मुलांचे बोरन्हाण घालण्याची देखील प्रथा आहे. मात्र, बोरन्हाण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येते.
महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वयोगट 1 ते 5 पर्यंतच्या मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक प्रथा आहे. तसेच संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते. त्यामुळे अशा ऋतुची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरन्हाण घातले जाते.
बोरन्हाण कसे घातले जाते?
बोरन्हाण घालताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवले जाते आणि त्यांचे औक्षण केले जाते. तसेच यावेळी मुरमुरे, तिळाच्या रेवड्या, बत्तासे, उसाचे तुकडे, भुईमूगाच्या शेंगा, बोर, गोळ्या करवंद अशा विविध गोष्टींचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. पूर्वी बोरन्हाण करताना केवळ फळांचा वापर केला जायचा. परंतु हल्लीच्या बोरन्हाण करताना फळांसोबतच चॉकलेट, गोळ्या, बिस्किट यांचा देखील वापर केला जातो. यावेळी इतर लहान मुलांना देखील बोलावलं जातं. यावेळी ती मुलं देखील बोरन्हाणाचा आनंद घेत खाऊ गोळा करतात.