Corona Live Update: माजी आमदार नरेंद्र पवार यांना कोरोनाची लागण

Corona Live Update: माजी आमदार नरेंद्र पवार यांना कोरोनाची लागण

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज मुंबईत कोरोनाचे १ हजार ३९० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार २५३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५४६४ वर पोहचला आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार १९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६७ हजार ८३० रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)

भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशअध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांना कोरोनाची लागण झाली असून ताप आणि खोकला जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यामध्ये त्यांच्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
लॉकडाऊन काळात कल्याणकरांच्या सेवेसाठी माजी आमदार नरेंद्र पवार गेली ४ महिने रात्रंदिन काम करत आहेत. हे काम करीत असतांनाच पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सोशल मिडीयावर त्यांच्या हितचिंतकांनी नरेद्र पवार लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
आपली तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. मागच्या ६-७ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले आहे. तर काही महत्त्वाचे काम असल्यास त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन मदत मिळणार असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची‌ काळजी घेण्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोरोनाला हरवून पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी मी लवकरच सक्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात ७९७५ नव्या रुग्णांची वाढ; २३३ जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ९७५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७५ हजार ६४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ३ हजार ६०६ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ६१३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)

राज्यात १,२१३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु
राज्यात सध्या 1 हजार 213 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहे. त्यात दिडशेहून अधिक पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 82 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित पोलिसांची वाढ असल्याचे आकडेवारीतून उघडकीस आले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 150 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 063 पोलीस कर्मचार्‍यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु होते.
आतापर्यंत कोरोनामुळे 82 पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात सहा पोलीस अधिकारी आणि 76 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले असून मुंबई पोलीस दलातील 47 पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत 313 पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात 879 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत 1 लाख 07 हजार 157 कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात 1 हजार 344 अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत 30 हजार 452 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 91 हजार 805 वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून 13 कोटी 40 लाख 55 हजार 987 रुपयांचा दंड वसुल केला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, सीमेवर लढणारे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता हे जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी ६८ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे. (Border Security Force) अर्थात बीएसएफच्या ६८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (सविस्तर वाचा)
जालन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पुन्हा जालन्यात उद्यापासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
३१ जुलैपर्यंत पंढपुरमधील विठ्ठल मंदिर बंद राहणार आहे. याबाबतचे परिपत्रक मंदिर समितीने काढले आहे.
पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. शहरातल्या मुख्य रस्त्यांवर येणारे उपरस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा 
आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ३९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार १०४ वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
देशातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा रेट हा ६३.२० टक्के आहे. तर देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मृत्यूदर हा ३.९५ टक्के आहे. सविस्तर वाचा 
चंद्रपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर १७ जुलै ते २० जुलै पर्यंत चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान जीवनाश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असणार आहेत. हे लॉकडाऊन फक्त चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी या लॉकडाऊन दरम्यान चंद्रपूर शहरात येऊ नये. तसेच या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जगात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १ कोटी ३४ लाख ५६ हजार ३४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ लाख ८१ हजार १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ लाख ४७ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात काल ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर वाचा 
First Published on: July 15, 2020 2:22 PM
Exit mobile version