दिल्लीतील अपघातप्रकरणी हॉटेल मॅनेजरकडून धक्कादायक खुलासा, मित्रांसोबत…

दिल्लीतील अपघातप्रकरणी हॉटेल मॅनेजरकडून धक्कादायक खुलासा, मित्रांसोबत…

Delhi Horror Case | नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कांजवाला येथे बलेनो कारने एका तरुणीच्या स्कुटीला धडक देऊन तिला खाली पाडले. कारला अडकलेल्या या तरुणीला तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, हा अपघात नसून ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात आता नवा खुलासा आला आहे. हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना दिलेल्या जबानीतून वेगळीच बाब समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये जोडप्यांना खोली दिली जाते. या हॉटेलमध्ये सायंकाळी साडेसात वाजता दोन तरुणी आल्या. थोड्या वेळाने या तरुणींचे मित्रही खोलीत गेले. मित्र आल्यानंतर तरुणींनी खोलीत धुडगूस घातला, अशी माहिती हॉटेल मॅनेजर अमित यांनी दिली.

हेही वाचा दिल्लीतील तरुणीचा ‘तो’ अपघात नव्हे, ‘निर्भया’ची पुनरावृत्ती; कुटुंबीयांचा दावा

या  दोन्ही तरुणी आणि मित्र यांच्यात वाद निर्माण झाला. दारू पिऊन मोठ्याने गोंधळ घातल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगितलं. बाहेर गेल्यानंतरही दोन्ही तरुणी वाद घालत होत्या. त्यामुळे तेथील स्थानिकांनी हस्तक्षेप करत त्यांना हटकले. म्हणून या तरुणी स्कूटीवरून निघून गेल्या. दोघीही मद्यधुंद अवस्थेत होत्या, तरीही त्यांनी स्कूटी चालवली.

हेही वाचा – दिल्ली तरुणी अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, स्कूटीवर होती आणखी एक मुलगी!

दरम्यान, या नंतरच हिट अॅण्ड रनचा प्रकार घडला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्यांनुसार तरुणांनी चारचाकी गाडीवरून स्कुटीला उडवताना पीडित तरुणीची मैत्रीणही तिथे उपस्थित होते. कारमधील पाच तरुणही मद्यपान करून गाडी चालवत होते. अपघात होताच तिची मैत्रीण तिथून पसार झाली.

स्कूटी आणि कारचा अपघात झाल्यानंतर पीडित तरुणी गाडीखाली आली होती, हे आम्हाला माहितच नाही, असा खुलासा या तरुणांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वळण लागले आहे. तसंच, तरुणीच्या मैत्रीणीने तिथून धूम ठोकल्याने ती पळून का गेली याचाही तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचं सिद्ध झालं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तरुणीचा मृत्यू अधिक रक्तस्राव झाल्याने झाला.

First Published on: January 3, 2023 3:51 PM
Exit mobile version