राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ द्या; शाहांचं ममतांना आवाहन

राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ द्या; शाहांचं ममतांना आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार आणि ओडिशा नंतर पश्चिम बंगालमध्ये व्हर्च्युअल रॅली काढत आहेत. यावेळी बंगालमधील जनतेला संबोधीत करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बंगाल सरकार केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये लागू करण्यात आलेली नाही. अन्य सर्व राज्यांनी ही योजना लागू केली आहे. परंतु ममता बॅनर्जी ही योजना पश्चिम बंगालमध्ये लागू करत नाहीत. ममता बॅनर्जी ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु याव्यतिरिक्त राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन-दोन हात होऊन जाऊ दे,” अशा शब्दांत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलं आहे.

अमित शहा यांनी आपल्या भाषणात सीएए, राजकीय हिंसाचार आणि केंद्रीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धारेवर धरलं. बंगालमध्ये सत्ता बदलेल आणि शपथ घेतल्याच्या एका मिनिटातच आयुष्मान भारत योजना बंगालमध्ये लागू होईल, असं शहा म्हणाले. अमित शहा पुढे म्हणाले की बंगालच्या लोकांशी संवाद साधण्यापासून ममता बॅनर्जी रोखू शकत नाहीत. आपण रस्ते आणि रॅली थांबवू शकता परंतु आपण बदल थांबवू शकत नाही. आम्ही आमच्या सरकारच्या कामांचा हिशोब देत आहोत, ममता जी, कृपया दहा वर्षाच्या कामाचा हिशोबही द्या.

ज्यावेळी सीएए कायदा आला तेव्हा ममता बॅनर्जींचा चेहरा रागाने लाल झाला होता. शाह यांनी ममता बॅनर्जींना विचारलं की नमसूद्र आणि मातुआ समाजाचा तुम्हाला त्रास का आहे? सीएएला विरोध करणं तु्हाला खूपच महागात पडेल, जेव्हा मतपेटी उघडेल, तेव्हा जनता आपल्याला राजकारणातून हद्दपार करेल.


हेही वाचा – आत्मसंतुष्ट होणं धोक्याचं, जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडतेय – WHO


प्रवासी मजुरांसाठी आम्ही ज्या ट्रेन चालवल्या त्याला श्रमिक ट्रेन असं नाव दिलं, पण ममता बॅनर्जी यांनी या गाड्यांना कोरोना एक्स्प्रेस म्हणून संबोधून कामगारांचा अपमान केला. शाह म्हणाले की मजुरांची ही गाडी तुम्हाला सत्तेतुन हद्दपार करेल. दरम्यान, जन धन खात्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की या कठीण काळात ५१ कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.

२०१४ मध्ये मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांना २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळालं. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष संपलं. ही ६ वर्षे भारताला प्रत्येक प्रकारे प्रगती करणारी ठरली आहेत. जनसंपर्क आणि जनसंवाद यावर इतिहास लिहिला जाईल तेव्हा जेपी. नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपने केलेल्या व्हर्च्युल रॅलीचा हा प्रयोग विशेष अध्याय म्हणून लिहिला जाईल. अमित शाह पुढे म्हणाले की, मला बंगालमधील लोकांना सांगायचं आहे की भाजपाला देशभरातून ३०3 जागा मिळाल्या आहेत. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंगालमधील १८ जागांवर विजय होय.

First Published on: June 9, 2020 1:01 PM
Exit mobile version