भारत-चीन सीमावादावर राजकारण बंद करा; अमित शाह काँग्रेसवर भडकले

भारत-चीन सीमावादावर राजकारण बंद करा; अमित शाह काँग्रेसवर भडकले

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 त 11 डिसेंबर रोजी भारत आणि चीन सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्रीतील भाजपवर आरोप केले होते. याच आरोपांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चोख प्रत्युत्तर देत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात भारत-चीन सीमेवर काय काय झाले याचे दाखले अमित शाहांनी दिले आहेत. यासोबत काँग्रेसच्या राजीव गांधी फाउंडेशनने 2005-2006 दरम्यान बेकायदेशीरपणे चीनी दूतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचा निधी घेतला होता, असा गंभीर आरोपही अमित शाह यांनी केला आहे.

काँग्रेसने 2005-2006 मध्ये चीनी दूतावासाकडून पैसे घेतले 

शाह यांनी संसदेबाहेर सांगितले की, अरुणाचल- चीन सीमेवर झालेल्या चकमकीबाबत आज विरोधकांनी विशेषत: काँग्रेसने प्रश्नोत्तराचा तास होऊ दिला नाही. संरक्षणमंत्री 12 वाजता निवेदन देणार असे सांगितल्यानंतर त्याला विरोध करण्याचे काही कारण नव्हते. मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची चिंता समजली. तो राजीव गांधी फाउंडेशनचा (RGF) फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द करण्याबाबतचा प्रश्न होता. राजीव गांधी फाउंडेशनने 2005-2006 दरम्यान बेकायदेशीरपणे चीनी दूतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचा निधी घेतला होता. जे FCRA चा कायदा आणि मर्यादांच्या बाहेर होता. या कारणास्तव गृहमंत्रालयाने त्यांची नोंदणी रद्द केली आहे. या फाऊंडेशनने आपले रजिस्ट्रेशन सामाजिक कार्यासाठी केले आहे. चिनी दूतावासाकडून मिळालेली रक्कम ही भारत-चीन संबंधांच्या विकासाबाबत संशोधनासाठी देण्यात आली होती, असे गंभीर आरोप अमित शाह यांनी केले आहेत.

1962 मध्ये चीनने बळकावलेल्या हजारो हेक्टर जमिनीत काँग्रेसचा सहभाग होता का, नेहरूजींमुळे सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाचा त्याग करण्यात आला होता, त्याबाबत त्यांनी संशोधन केले होते का, केले तर त्यातून काय निष्पन्न झाले. ज्या वेळी आमच्या सैन्याचे शूर सैनिक गलवानच्या आत चिनी सैन्याशी लढत होते, त्या वेळी चीनच्या दूतावासाच्या अधिकाऱ्याला कोण पाठवत होते. हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता का, होता तर त्यातून निष्कर्ष काय समोर आला? 2006 मध्ये चिनी दूतावासाने संपूर्ण अरुणाचलवर दावा केला होता. 25 मे 2007 रोजी चीनने काँग्रेसचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना व्हिसा नाकारला, मनमोहन सिंग यांच्या 13 ऑक्टोबर 2009 च्या अरुणाचल भेटीवर चीनने आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले, त्याबाबत चौकशी झाली का? असे अनेक गंभीर सवाल अमित शाहांनी काँग्रेसविरोधात उपस्थित केले.

मनमोहन सिंग यांच्या 13 ऑक्टोबर 2009 च्या अरुणाचल भेटीवर चीनने आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले. 2010 मध्ये चीनने काश्मीरमधील लोकांना स्टेपल्ड व्हिसा देण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये काँग्रेस सरकारने चीनच्या धमक्यांमुळे डेंगचोकमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे बांधकाम थांबवले, याबाबत चौकशी झाली का? असा सवालही अमित शाहांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या काळात चीनने भारताची हजारो किमी जमीन बळकावली

मला काँग्रेसला विचारायचे आहे की, जनतेसमोर दुटप्पीपणा चालत नाही. जनता पाहत आहे. गांधी परिवाराकडून चालवले जाणाऱ्या फाऊंडेशनची FCRA नोंदणी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसच्याच काळात हजारो किलोमीटर जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्यात आली आहे. काँग्रेसच्याच काळात सुरक्षा परिषदेची सदस्यता स्वत:च्या स्वार्थासाठी चीनला दिली. हे सर्व विषय जनतेला माहीत आहेत, असा गंभीर आरोप अमित शाहांनी केला आहे.

भारताची कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही

हे भाजपचे सरकार आहे, मोदी पंतप्रधान आहेत, जोपर्यंत भाजपचे मोदी सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही, असा इशारा देत काल 8-9 च्या मध्यरात्री चीन सैन्याविरोधात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचे अमित शाहांनी कौतुक केले.


शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन; वर्षभरातील दुसरी घटना

First Published on: December 13, 2022 12:21 PM
Exit mobile version