जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा – गुप्तचर संस्था

जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा – गुप्तचर संस्था

लडाखमध्ये चीनची खुसखोरी, चीनी सैनिक ताब्यात

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान, दहशतवादी हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांकडून देण्यात आला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हे हल्ले करतील, असेही याबाबतच्या दक्षता सूचनांमध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात ११ एप्रिल ते ६ मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत दक्ष राहण्याचा सल्ला गुप्तचर संस्थांनी दिला आहे. दरम्यान, गृहमंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० जवान पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहशतवाद्यांना देण्यात आले प्रशिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तीन पथके तयार केली आहेत. त्यातील दहशतवाद्यांना मतदान केंद्रे आणि उमेदवारांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना स्फोटके हाताळण्याचे देखील प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक मतदान केंद्र आणि उमेदवाराला संरक्षण देणे ही खरोखरच अत्यंत कसोटीची जबाबदारी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले आहे. त्यासोबत लोकसभा निवडणुकीनंतर जर विधानसभेची निवडणूक झाली तर, आणखी ११ हजार मतदान केंद्रांना आणि ९०० उमेदवारांना संरक्षण द्यावे लागेल.

First Published on: April 5, 2019 9:01 AM
Exit mobile version