अदानी समूहाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणखी आक्रमक, आज देशव्यापी आंदोलन

अदानी समूहाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणखी आक्रमक, आज देशव्यापी आंदोलन

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावरून राज्यसभा आणि लोकसभेत विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. त्यानंतर हे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. आज 6 फेब्रुवारीला काँग्रेसकडून या प्रकरणी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आज काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली होती.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला फटकारत म्हंटले होते की, ‘केंद्र सरकार आपल्या जवळच्या मित्रांना मदत करण्यासाठी सामान्य जनतेच्या पैशाचा वापर करत आहे. त्यामुळे देशभरात असलेल्या जिल्ह्यातील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयांसमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे.’ तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (ता. 6 फेब्रुवारी) सकाळी 9.30 वाजता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

गेल्या शुक्रवारी (ता. 3 फेब्रुवारी) विरोधकांनी अदानी प्रकरणावरून सभागृहात बराच गदारोळ घातला होता, त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. पण विरोधकांकडून आंदोलनाच्या माध्यामातून केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती बनविण्यात आली आहे. याशिवाय बीबीसी डॉक्युमेंटरीबाबतही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस खासदार आज संसद भवनातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत. सरकार या विषयावर संसदेत चर्चा होऊ देत नसल्याचे खासदारांचे म्हणणे आहे. रविवारी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारले. जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अदानीच्या प्रकरणावरून मोदी सरकारने मौन बाळगल्याने त्यांनी आम्हाला ‘आम्ही अदानीचे कोण आहोत?’ अशी सिरीज सुरु करण्यासाठी भाग पाडले आहे. त्यामुळे आता आम्ही दररोज केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारणार आहोत.

हेही वाचा – अदानी समूहाच्या प्रकरणावर ‘सेबी’ची प्रतिक्रिया; ‘हे’ निवेदन जारी

दरम्यान, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी ह्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अनेक खासगी बँकांना याचा फाटका बसला. त्यानंतर आरबीआयने या प्रकरणात उडी घेत अदानी यांना कोणत्या बँकेने किती कर्ज दिले? आणि त्याची स्थिती काय? याबाबत संपूर्ण माहिती मागवली. तसेच सरकारकडून अदानी समूहाला देण्यात आलेले प्रकल्प रद्द करण्याची मागणी देखील काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

First Published on: February 6, 2023 9:12 AM
Exit mobile version