बिल्किस बानो प्रकरणातील ‘त्या’ दोषीवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल

बिल्किस बानो प्रकरणातील ‘त्या’ दोषीवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा घटनेनंतर 2002च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची ऑगस्ट महिन्यात गोध्रा उपकारागृहातून मुदतपूर्व सुटका करण्यात आली होती. त्यावरून तीव्र पडसाद उमटले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. चांगली वर्तणूक आढळल्याने या दोषींची मुदतपूर्व मुक्तता केल्याचा खुलासा गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता. परंतु, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ११ दोषींपैकी एकावर आणखी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. यावरील प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा – …म्हणून बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची मुक्तता, गुजरात सरकारचा सुप्रीम कोर्टासमोर खुलासा

११ दोषींपैकी नितेश चिमणलाल भट २०२० मध्ये पॅरोलवर सुटला होता. यावेळी त्याने एका महिलेचा विनयभंग केला. जून २०२० मध्येच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खटला अजून प्रलंबित आहे. गुजरात सरकारच्या शपथपत्रातूनच ही माहिती समोर आली आहे.


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कैद्यांची सुटका करण्याचे आदेश केंद्र सरकारने एका विशेष धोरणाद्वारे राज्यांना दिले होते. परंतु या धोरणातून बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या आरोपींना वगळण्यात आले होते. असे असताना बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात आल्याचे सांगत विरोधकांनी गुजरात तसेच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. तथापि, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचा भाग म्हणून कैद्यांना सूट देण्याच्या परिपत्रकानुसार या दोषींची मुक्तता करण्यात आलेली नसल्याचे गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

हेही वाचा – बिल्किस बानोप्रकरणातील सुटलेल्या आरोपींविरोधात २९ नोव्हेंबरला होणार सुनावणी

First Published on: October 19, 2022 9:52 AM
Exit mobile version