आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी जाणार गुजरातला

आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी जाणार गुजरातला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची आई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या, रविवारी गुजरातला जाणार आहेत. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भरुभरुन मते देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी सोमवार, २७ मे रोजी काशीला जाणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.’

३० मे रोजी शपथविधी होणार 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी बहुधा येत्या गुरुवारी ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. काल शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा, असे दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.

First Published on: May 25, 2019 1:18 PM
Exit mobile version