घरदेश-विदेशमोदी २.० मध्ये जेटली, सुषमा स्वराज नसणार; गडकरींबद्दलही प्रश्नचिन्ह?

मोदी २.० मध्ये जेटली, सुषमा स्वराज नसणार; गडकरींबद्दलही प्रश्नचिन्ह?

Subscribe

मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबतची चर्चा आता रंगू लागली असून एकदोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाने स्वबळावर ३०३ जागा मिळविल्या, तर एनडीएला ३५२ जागा मिळाल्या. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार असून ३० मे रोजी त्यांच्यासह मंत्रीमंडळातील नवे सदस्य शपथ घेणार आहेत. मात्र या नव्या ‘मोदी २.०’ सरकारमध्ये आधीच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक जुनेजाणते सदस्यांचा समावेश नसणार आहे. तर काही नवीन आणि तरूण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.

गडकरींकडे काय असेल जबाबादारी?

भाजपाच्या विश्वसनीय सू्‌त्रांनी ‘माय महानगर’ला दिलेल्या माहितीनूसार प्रकृतीच्या कारणास्तव यंदाच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्रीपदी राहिलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि अर्थमंत्रीपदी राहिलेल्या अरूण जेटली यांचा समावेश नसणार आहे. दोघेही भाजपाचे ज्येष्ठ नेते असून यापूर्वीच्या मोदी सरकारमधील त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. मात्र त्यांनी स्वत:च मंत्रीपदासाठी नकार दिल्याची माहिती आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे दावेदार समजले जाणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची या पूर्वीची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते असा कयास आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्यावर यंदा केंद्रीय मंत्रीपदाची धुरा सोपविली जाईल किंवा नाही? या बाबत शंका आहे. तसे झाले तर राज्यातील जनतेसाठी हा धक्कादायक निर्णय असेल. पण गडकरींची कार्यक्षमता पाहता कदाचित त्यांच्यावर पुन्हा मंत्रीपद किंवा पक्षसंघटनेतील जबाबदारी सोपविली जाऊ शकते. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत असल्याचे दिल्लीतील भाजपाच्या वर्तुळातील काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

- Advertisement -

रावसाहेब दानवेंना मंत्रीपद?

मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून पूर्वीचेच काही चेहरे पुन्हा दिसू शकतात. त्यात पियूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. सध्या भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले आणि जालना मतदारसंघातून पाचव्यांदा खासदार झालेले रावसाहेब पाटील दानवे यांचेही नाव मंत्रीपदासाठी पुढे येत आहे. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपाने चांगली कामगिरी केली असल्याने आणि आगामी काळात विधानसभा निवडणूका असल्याने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाचीच धुरा कायम ठेवण्यात येऊ शकते. खा. दानवे यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री होते. त्यामुळे यंदा त्यांच्या जवळच्या लोकांना ते पुन्हा केंद्रात मंत्री व्हावेत असे वाटू लागले आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर तसे बॅनर तयार करून शुभेच्छा देण्यासही सुरूवात केली आहे. मात्र त्यासंदर्भात ३० मे पर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकते.

अमित शहा गृहमंत्री?

मोदी २.० मध्ये अमित शहांना गृहमंत्रीपदासारखी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी यांच्यावरही चांगल्या खात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची कामगिरी चांगली राहिल्याने यंदा त्यांच्यावर तीच जबाबदारी येण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री पद भूषविलेल्या राजनाथसिंह यांच्यावर दुसरी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कृषी मंत्री किंवा ग्रामविकास खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाऊ शकते. महाराष्ट्रातून शिवसेनेला यंदा तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तर एनडीएचा घटक असलेल्या रिपाईंचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रीमंडळातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -