President Election 2022 : राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावावर विरोधी पक्षांचा शिक्कामोर्तब

President Election 2022 : राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावावर विरोधी पक्षांचा शिक्कामोर्तब

देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडीबाबत मंगळवारी विरोधी पक्षांची मंगळवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवार निवडीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सर्व विरोधी पक्षांनी एकमताने यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली असल्याची चर्चा आहे. यामुळे सिन्हा 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे मानले जातेय.

दरम्यान विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांनी नकार दिला. याबरोबर गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव समोर आले मात्र त्यांनी या प्रस्तावास नकार देण्यात आला. यानंतर आता यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र सत्ताधारी भाजपकडून अद्यापही राष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजप कोणता चेहरा उभा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान आज झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासह जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स), तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव यांनी हजेरी लावली होती. याशिवाय AIMIM खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते.

विरोधी पक्षांच्या बैठकीआधी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले होते की, ममता बॅनर्जींनी मला टीएमसीमध्ये जो सन्मान, प्रतिष्ठा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता वेळ आली आहे की, एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी पक्षापासून दूर राहून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. मला खात्री आहे की, पक्ष माझं ही कृती मान्य करेल.

दरम्यान आज सत्ताधारी भाजपनेही बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत संसदीय पक्षांसह राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडीची जबाबदार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे.


नार्वेकर, फाटक यांना एकनाथ शिदेंची भेट घेण्यासाठी पाठवणे फक्त औपचारिकताच?

First Published on: June 21, 2022 5:14 PM
Exit mobile version