Amrutpal Operation: पंजाब पोलिसांना मोठे यश; अमृतपालची निकटवर्तीय ‘ही’ व्यक्ती अटकेत

Amrutpal Operation: पंजाब पोलिसांना मोठे यश; अमृतपालची निकटवर्तीय ‘ही’ व्यक्ती अटकेत

अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी बलवंत सिंग याला लुधियानातून अटक

फरारी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलीस शोधत आहेत. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना रविवारी मोठे यश मिळाले. पोलिसांनी अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी बलवंत सिंग याला लुधियाना जिल्ह्यातील खन्ना शहरातून अटक केली आहे. बलवंत सिंगनेच अमृतपाल सिंगच्या जवळच्या तेजिंदर सिंग गिलला आश्रय दिला होता.

पोलिसांनी सांगितले की, अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय तेजिंदर सिंग गिल याला आश्रय देणाऱ्या बलवंत सिंगला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, अमृतपाल सिंग आणि बलवंत सिंग यांच्यात अद्याप कोणताही दुवा सापडलेला नाही.

गोरखा बाबाचा व्हिडिओ व्हायरल

पंजाब पोलिसांनी शुक्रवारी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या कोअर टीमचा सदस्य तेजिंदर सिंग गिल उर्फ ​गोरखा बाबा याच्या फोनमधील एक आक्षेपार्ह व्हिडिओ जारी केला होता. तेजिंदर सिंग गिल याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे .

अटकेच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. पंजाब पोलिसांनी शनिवारी लोकांना कट्टरपंथी धर्मोपदेशक अमृतपाल सिंगच्या अटकेबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणार्‍या अफवांवर आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. शनिवारी पत्रकार परिषदेत भटिंडाचे एसएसपी गुलनीत खुराणा म्हणाले, आम्ही लोकांना अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतो. यूके, अमेरिका आणि कॅनडात बसलेले काही लोक अमृतपालला अटक झाल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवत आहेत. तुरुंगात त्याचा छळ केला जात आहे, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, तो अजूनही फरार आहे.

( हेही वाचा: मिंध्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढणार का? हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान )

उत्तराखंड पोलिसही अलर्ट मोडवर

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) व्ही मुरुगेसन यांनी शनिवारी सकाळी सांगितले होते की, अमृतपाल सिंग उत्तराखंडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व जिल्हा पोलिसांना सजग करण्यात आले असून, सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

First Published on: March 27, 2023 8:17 AM
Exit mobile version