बाबरी प्रकरणी ९ महिन्यात निकाल देण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

बाबरी प्रकरणी ९ महिन्यात निकाल देण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

बाबरी खटल्याची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी पुढील नऊ महिन्यात या खटल्याचा निकाल द्यावा, असे निर्देश आज, शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांविरोधात हा खटला सुरू आहे. बाबरी खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नऊ महिन्यांच्या आत या खटल्याचा निकाल देण्यात यावा, असे आदेश यादव यांना कोर्टाने दिले. यादव हे ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. खटल्याचे कामकाज संपवण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे यादव यांनी गेल्या सुनावणीदरम्यान कोर्टात सांगितले होते. त्यावर निकाल देईपर्यंत विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत काय करता येईल, याचे उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. दरम्यान, कोर्टाने विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवला. तसेच या खटल्याचा नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे आदेश त्यांना दिले.

राममंदिर प्रकरणाचीही होणार जलद सुनावणी 

दरमयान, अयोध्या राम मंदिरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. येत्या २ ऑगस्टपासून दररोज या प्रकरणाची सुनावणी कोर्टात होणार असून ५ न्यायधीशांचे खंडपीठ ही सुनावणी घेणार आहेत. ३१ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ समितीला यावेळी दिले. या प्रकरणावर २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता खुल्या कोर्टात सुनावणी होणार असून त्यात मध्यस्थ समितीमार्फत या प्रकरणावर तोडगा काढायचा की या प्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

First Published on: July 19, 2019 1:46 PM
Exit mobile version