मंकीपॉक्सबाबत WHO कडून युटर्न; जगभर चिंता वाढली

मंकीपॉक्सबाबत WHO कडून युटर्न; जगभर चिंता वाढली

कोरोनानंतर (Corona) जगभर मंकीपॉक्सची (Monkeypox) भिती वाढली आहे. कोरोनाप्रमाणेच हा संसर्गजन्य (Virus) आजार असल्याने जागतिक आरोग्य संघनटेने काळजीचे कारण व्यक्त केले आहे. दरम्यान, सुरुवातीला या मंकीपॉक्स आजारावर नियंत्रण मिळवता येईल असं जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटलं होतं. मात्र, WHOने आपल्या वक्तव्यावर युटर्न घेतला असून या आजारावर नियंत्रण मिळवता येईल की नाही याची खात्री नसल्याचं म्हटलं आहे. WHOच्या या वक्तव्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

मंकीपॉक्स (Monkeypox) हा दुर्मिळ आजार असून प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनातील लोकांना हा आजार होतो. या आजाराची साथ पसरली असून जगभरातील ३० देशांत या मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. जगभरातील ५५० पेक्षा लोकांना याची लागण झाली असून तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाचे प्रमुख डॉ. हंस क्लुगे यांनी या आजाराविषयी शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, आपण मंकीपॉक्सवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू की नाही हे अद्याप माहिती नाही. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेनंतर आता युरोपमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक झाला आहे. युरोपमध्ये मंकीपॉक्सचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

पुढे खबरदारीचा उपाय सांगताना ते म्हणाले की, कोरोनासारखा मंकीपॉक्स मोठ्या प्रमाणात नसला तरी आरोग्य प्रशासनाने धोका टाळण्यासाठी आवश्यक आणि तातडीची पावलं उचलायला हवीत. वेगाने आणि एकत्रितरित्या ही परिस्थिती तपासण्याची आणि नियंत्रित करण्याची महत्त्वाची संधी आता आपल्याकडे आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

ताप, पुरळ आणि गाठी येणे हे मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे (symptoms for Monkeypox)आहेत. यामध्ये कदाचित वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतो. ही लक्षणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसतात, त्यानंतर निघून जातात. कधीकधी ही लक्षणे गंभीरही असू शकतात.

मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी यांच्याशी संपर्क आल्यास हा आजार पसरतो. तसेच, प्राण्यांच्या दूषित सामग्रीद्वारे मानवामध्ये हा आजार पसरतो. उंदीर आणि खारूताईमध्ये हा आजार सर्वाधिक आढळतो.

First Published on: June 3, 2022 6:58 PM
Exit mobile version