आहार करा, टाळू नका

आहार करा, टाळू नका

International No Diet Day

डाएट ब्रेकर्स ग्रुपच्या संचालिका, मेरी इव्हान्स यंग. एनोरेक्सिया नर्वोसा नामक आजाराने ग्रस्त मेरी इव्हान्स यंग यांनी स्वतःला आहे तसे स्वीकारले. अनियंत्रित वजनामुळे शरीराचा झालेला अक्राळविक्राळ आकार मेरी इव्हान्स यंग यांना चिंतेत टाकत होता. सुडौल शरीरासाठी एनोरेक्सिया नर्वोसा नामक आजारावर मात करणे गरजेचे होते. मात्र, त्यासाठी आवश्यक होते आहाराच्या सवयी बदलणे. मेरी इव्हान्स यंग यांनी खूप प्रयत्नांती स्वतःला आहे तसे स्वीकारले. पुढे आपल्या जीवनातील या बदलाला मेरी इव्हान्स यंग यांनी चळवळीचे स्वरूप देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी लोकांनी स्वतःला आहे तसे स्वीकारावे यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. डाएट ब्रेकर्स ग्रुपच्या संचालिका, मेरी इव्हान्स यंग यांनी विविध कार्यक्रमांद्वारे लोकांना स्वतःवर प्रेम करा, भरपूर खा, स्वतःला आहे तसे स्वीकारा सांगत जनजागृती करण्यास सुरुवात केली. मेरी इव्हान्स यंग यांनी आपल्या ‘डाएट ब्रेकिंग : हॅविंग इट ऑल विदाऊट हॅविंग टू डाएट’ या पुस्तकात त्यांनी अनुभवलेल्या संतापजनक घटनांचा उल्लेख केला आहे. पैकी एक घटना घडली वर्ष १९९१ मध्ये. कॉफी ब्रेक दरम्यान डाएट कॉन्शिअस महिलांच्या ग्रुपमधील संवादाने मेरी इव्हान्स यंगना प्रचंड राग आला. त्या महिलांमधील संवादही संताप निर्माण करणाराच होता म्हणा.

कॉफी सह बिस्कीट घेणार का? या प्रश्नावर महिलांमध्ये चर्चा रंगली होती. पैकी एका महिलेने नाही नको म्हणून कॉफीसह बिस्कीट खाण्यास नकार दिला, तर दुसरीने एकाच बिस्किटावर समाधान मानले. महिलांचा संवाद मेरी इव्हान्स यंग यांच्या कानावर पडताच त्या संतप्त झाल्या. त्यांनी तत्काळ त्या महिलांना हटकले? मेरी यांनी त्या महिलांना एकच मार्मिक प्रश्न केला. मेरी त्या महिलांना म्हणाल्या की, आहारापेक्षा करिअरच्या चर्चेवर वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? अशाच काही घटनांनी प्रेरित होऊन मेरी यंग यांनी नो डाएट डे साजरा करण्यास सुरुवात केली. २१ ते ७६ वर्षे वयोगातील काही महिलांच्या गटासोबत मेरी यांनी स्वतःच्या घरात एका पार्टीचे आयोजन केले. यावेळी त्या महिलांनी ‘डिच द्याट डाएट’ म्हणत खाण्यावर ताव मारला. तो दिवस होता, ५ मे १९९२. पुढे १९९३ पासून मेरीच्या चळवळीने प्रेरित होऊन जगभरातील फेमिनिस्ट लोकांनी आपापल्या देशात नो डाएट डे साजरा करण्यास सुरुवात केली. खरंच मेरी यंगच्या स्तुत्य उपक्रमाची आज नितांत आवश्यकता भासते. वाढलेले वजन आटोक्यात आणण्यासाठी आहारावर नियंत्रण आणून स्वतःची उपासमार करणे कितपत योग्य? हा प्रश्न आज प्रत्येक डाएट कॉन्शिअस व्यक्तीने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. भारतातील अनेक आहारतज्ज्ञही आहाराच्या वेळा पाळा पण आहार टाळू नका म्हणून आवर्जून सांगतात. तेव्हा नो डाएट डे च्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, स्वतःला आहे तसे स्वीकारा, थोड्या थोड्या फरकाने भरपूर खा आणि स्वस्थ, निरोगी आरोग्याचा आनंद लुटा.

First Published on: May 6, 2019 4:18 AM
Exit mobile version