पावसाळ्यामध्ये ‘या’ भाज्यांना करा बाय-बाय

पावसाळ्यामध्ये ‘या’ भाज्यांना करा बाय-बाय

उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि विशेषत: पालेभाज्या खाणं गरजेचं असतं. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही भाज्या खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. बऱ्याचशा भाज्या या बाजारात येण्यापूर्वी विविध ठिकाणांहून वाहतूक करुन आणल्या जातात. पावसाळ्यामध्ये वातावरणात जंतूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी अपयाकारक ठरू शकतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाज्या.

पालेभाज्या उगवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागतं. या दिवसांत पाणी दुषित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्यांच्या पानांमध्ये छोटे कीडे तसंच त्यांची अंडी वाढण्याची भीती असते. त्यामुळे या मौसमात पालेभाज्या खाणं टाळा किंवा खायच्या असल्यास वापरण्यापूर्वी त्या काही काळ कोमट पाण्यात ठेवा.

बटाटे, भेंडी, मटार, फुलकोबी या भाज्या खाणं टाळा. मुळातच या भाज्या पचायला जड असतात. शिवाय या दिवसांत सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे जड भाज्या खाल्यास पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

फिटनेससाठी अनेकजण कच्चं सॅलड खाणं पसंत करतात. मात्र, पावसाळ्यात भाज्यांवर वाढणारे किटाणूंचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्या कितीही धुतल्या तरी त्यांच्यावर किटाणू राहण्याचा धोका असतोच. त्यामुळे सॅलड खायचं झाल्यास ते स्टीम करुन खावं.

पावसाळ्यात मशरूम खाणं आवर्जून टाळा. मशरूम जमिनीमध्ये उगवत असल्यामुळे साहजिकच त्यांच्यात किटाणूंचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो. पावसाळ्याच्या दिवसांत याचे प्रमाण अनेक पटीने वाढते. त्यामुळे मशरूम खाणं टाळा.

First Published on: June 13, 2018 10:08 AM
Exit mobile version