आरोग्यवर्धक चिंच

आरोग्यवर्धक चिंच

Tamarind

चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग दूर करा

चिंचेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडिअम, आयर्न आणि झिंक हे घटक आढळतात. याव्यतिरिक्त चिंचेमध्ये प्रोटीनही मुबलक प्रमाणात असतं. चवीला आंबट असणारी चिंच त्वचेसाठीही गुणकारी ठरते. चकचकीत, तजेलदार त्वचेसाठी चिंचेपासून तयार करण्यात आलेला फेसवॉश चेहरा स्वच्छ करतो त्याचप्रमाणे यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला आवश्यक ती पोषक तत्व मिळवून देण्यासाठी मदत करतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा वापर केल्यास सुरकुत्या, चेहर्‍यावरील डाग दूर होऊन चेहरा उजळून त्वचा मुलायम होते. चिंचेतील पोषक तत्व चेहर्‍यावरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करून तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. चिंचेमध्ये अ‍ॅसिडिक गुण असतात. त्यामुळे हे नैसर्गिक टोनर आणि क्लिनर म्हणून काम करतात.

चिंचेचा फेसवॉश

चमचा चिंचेचा कोळ, १ चमचा दही, १ चमचा गुलाबपाणी घ्या. एका काचेच्या वाडग्यात सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार फेसवॉश १० ते १५ मिनिटे चेहर्‍यावर राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून टाका.

चिंचेचे इतर आरोग्यवर्धक गुण

* चिंचेपासून तयार केलेले चिंचालवण तेल पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले की पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात.

* पिकलेली चिंच वात, पित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांवर गुणकारी आहे. चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे. पचनशक्ती वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम चिंच करते. चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होईपर्यंत घ्यावे.

* चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते. रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. काविळीमध्ये भूक वाढावी यासाठी रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळीमध्ये अमृताचे काम करते.

* तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी. मुका मार लागून सूज आली कि चिंचोके (चिंचेच्या बिया) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गर यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.

First Published on: March 15, 2019 4:26 AM
Exit mobile version