मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या ‘भोगी’चे महत्व

मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या ‘भोगी’चे महत्व

जाणून घ्या 'भोगी'चा अर्थ आणि त्याचे महत्व.

मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. ‘न खाई भोगी तो सदा रोजी’ हे आपण आपल्या आजीकडून नेहमी ऐकले आहे. मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व देखील.

‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण असून हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा. या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.

हे आहे या सणाचे महत्व

जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. त्यामुळे या महिन्यात हिवाळा देखील असतो. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास विसावा लागतो. दरम्यान, या भोगी सणानिमित्त शेतकरी भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र, ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात.

भारतभर साजरा केला जातो ‘भोगी’

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला इतर ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’ म्हणून सजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करुन चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.


हेही वाचा – मकरसंक्रात स्पेशल : तिळगुळ खा, आरोग्य सुदृढ ठेवा!


 

First Published on: January 13, 2020 6:00 AM
Exit mobile version