लहान मुलांसाठी पराठ्याचे काही प्रकार

लहान मुलांसाठी पराठ्याचे काही प्रकार

पराठे

लहान मुलांच्या भाजी खाण्यामध्ये अनेक आवडी निवडी असतात. पण प्रत्येक प्रकारची भाजी त्यांच्या पोटात जाणे आवश्यक असतात यासाठी काही सोप्प्या आणि मुलांना आवडतील अशा प्रकारे त्यांच्या आवडत्या पदार्थात त्यांना आवडत नसलेल्या भाज्या घालून दिल्या की ते आवडीने खातात. म्हणूनच आम्ही काही पराठ्याचे प्रकार सांगणार आहोत.

दुधी भोपळ्याचा पराठा
मुलांना दुधीची भाजी आवडत नसल्याने ते खाण्याचे टाळतात. पण दुधी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते त्यामुळे तिचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

पराठा बनवण्यासाठी चांगला कोवळा दुधी बघून तो किसून घ्या. त्या किसलेल्या दुधीमध्ये जिरे पूड, हळद, तिखट, मीठ घाला. थोडा वेळ तसंच ठेवा. पाणी सुटल्यावर कणिक घाला. पराठे लाटून भाजा आणि लोणचं किंवा चटणी बरोबर किंवा तुपाबरोबर खायला द्या.

गाजर-बीट पराठा
गाजर आणि बीट कुकरला वाफवून घ्या. २ गाजरं असतील तर १ बीट अशाप्रकारे गाजर आणि बीट घ्यावे. उकडलेले गाजर आणि बीट गार झाल्यावर दोन्ही चांगले कुस्करा. त्यात फक्त जिरेपूड आणि मीठ घाला. कणिक घालून पीठ भिजवा. तूप लावून भाजा.

कोबी पराठा
कोबी बारीक किसून घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद घाला. जरा वेळ तसंच ठेवा. नंतर त्यात हवी तितकी कणिक घाला. पीठ भिजवा आणि पराठे करा.

मुळ्याचा पराठा
ही बहुतेक मुलांची नावडती भाजी. या भाजीचा पराठा कसा करायचा ते आपण पाहूया. मुळा जाडसर किसून घ्या. मुळ्याला पाणी सुटले असले तर ते थोडे निथळून घ्या.पूर्ण पाणी काढू नका. या किसामध्ये तिखट, मीठ, धणे पूड,आमचूर किंवा लिंबाची पावडर घाला. बारीक कोथिंबीर घाला. दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी ठेवून कडा दाबून बंद करा. परत हलक्या हातानं थोडं लाटा. तूप लावून भाजा.

कोथिंबीर पराठा
कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरा. त्यात तिखट, मीठ आणि जिरेपूड एकत्र करा. गव्हाचे पीठ किंवा मिश्र डाळीचे पीठ टाकून मळा आणि त्याचे पराठे करा.

First Published on: December 12, 2018 4:39 AM
Exit mobile version