नातं उलगडताना…

नातं उलगडताना…

Relationship

मुलगी वयात येत असताना मुलींच्या हार्मोन्समध्ये बरेच बदल होत असतात. यामुळे तिच्या वागण्या-बोलण्यात पूर्वीपेक्षा अनेक बदल झालेले दिसतात. यात तिची चिडचिड होणे, काही कारणास्तव एकमत न झाल्याने तुमच्या समोर तिच्या आवाजाचा स्वर वाढू शकतो. अशावेळी तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही तर ती शांत राहील . तिच्या पौगंडावस्थेत तिला समजून घेताना तुमच्या नात्याला योग्य वेळ द्या. आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना तिच्या आवडी-निवडी आवर्जून विचारात घ्या. तिच्याशी मित्राच्या नात्याने वागताना घरात तिला समान स्थान द्या. घरातील कोणताही लहान-मोठा निर्णय घेताना तिचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा तुमच्या मुलीशी असलेला संवाद अधिक कसा वाढेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन संवाद वाढवा. जेणेकरून केव्हाही कोणत्याही विषयावर तिला निःसंकोचपणे , न अडखळता तुमच्याशी बोलता येईल.

सहाजिकपणे आपली मुलगी मोठी होत असताना कोणत्याही वडिलांना तिची काळजी आणि चिंता वाटते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलीला तिच्या मनाप्रमाणे जगावे, कोणतेही जास्तीचे बंधन नसावे, असे तिला आसपासच्या वातावरणामुळे वाटू लागते. अशावेळी तुम्ही तिच्यावर बंधने ,मते लादली तर वडिलांच्या आणि घरच्यांच्या अति काळजीने मुलगी मानसिकरित्या दुरावली जाऊ शकते. अशावेळी तिच्याबद्दल मनात कुठलीही अढी न ठेवता तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. तुम्हाला तिच्याबाबतीत अधिक काळजी करण्यासारखे काही वाटलेच, तर मुलीशी नीट बसून चर्चा करा. तिची मते, विचार जाणून घेत तुमची काळजी सविस्तरपणे सांगितल्यास तुमच्यात कोणतेही मतभेद होणार नाहीत.

महाविद्यालयात शिकत असताना मुलीच्या मित्र-मैत्रिणींना जसे आहेत तसे स्वीकारणे बर्‍याचदा वडिलांना अवघड जाते. अशावेळी तिच्या याच मित्रांपैकी एखादा मित्र तिला आवडू लागला, तर तिला विश्वासात घेऊन त्याबद्दल अधिक विचारपूस न करता आपल्या मुलीने आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर जोडीदाराची निवड करणे योग्य आहे, ते समजावून सांगत तिला तिच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे, हे पटवून द्या.

वयोमानानुसार तुम्हाला अनुभव जरी अधिक असला तरी तुमची मते तसेच विचार तिच्यावर लादू नका. तिने केलेल्या चुका तिला समजावत तिला काय चूक काय बरोबर याची चर्चा करून तुम्ही तिच्या पाठीशी आहात, हे सांगा. मुलीच्या जीवनात आईपेक्षा वडिलांचा पाठिंबा तिच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून तिला परावलंबी न करता स्वतंत्र होण्यास तिच्या पाठीमागे उभे रहा. ‘ती’ ला समजून घेताना आधी तिचा एक जवळचा मित्र बना.

First Published on: March 1, 2019 5:13 AM
Exit mobile version