नवी मुंबईतील अल्पवयीन मुलाचा ठाण्यात बुडून मृत्यू

नवी मुंबईतील अल्पवयीन मुलाचा ठाण्यात बुडून मृत्यू

ठाणे : कळवा, पारसिक हिल येथील कारगिल डोंगरावरील विहिरीमध्ये पोहताना नवी मुंबईतील एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. तो आपल्या सहा मित्रांसोबत शुक्रवारी पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

नवी मुंबईत दिघा येथे राहणारा सुमीत माळी हा 17 वर्षीय मुलगा आपल्या सहा मित्रांसोबत कारगिल डोंगरावरील विहिरीमध्ये पोहण्याकरिता गेला होता. ही विहिर अंदाजे 30 ते 35 फूट खोल असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे सुमीत बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्या येत आहे.

हेही वाचा – अमरनाथ ढगफुटीमुळे १६ भाविकांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता; भर पावसातही बचावकार्य सुरूच

कारगिल डोंगरावरील विहिरीत एक जण बुडल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दूरध्वनीवरून देण्यात आली. त्यानुसार कळवा पोलीस कर्मचारी, सहाय्यक आयुक्त (कळवा प्रभाग समिती), प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील स्विमर्स, तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पण हा प्रकार सुमारे 700 ते 800 मीटर उंची असलेल्या डोंगरावरती असलेल्या विहीरीत घडला होता. त्यातच जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे तसेच रात्रीच्या अंधारामुळे त्या ठिकाणी पोहचणे कठीण झाले होते. त्यानंतर रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. नंतर शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून त्या ठिकाणी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुमीतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा – शिवसेना कात टाकणार? उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची नियुक्ती; दोघांची हकालपट्टी

First Published on: July 9, 2022 1:01 PM
Exit mobile version