चौकशीसाठी मी ईडी कार्यालयात जाणार – अनिल परब

चौकशीसाठी मी ईडी कार्यालयात जाणार – अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे आज ईडी कार्यालयात चौकशीला जाणार आहेत. यासंदर्भात अनिल परब यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. ईडीने कशासाठी चौकशीला बोलावलं आहे याची कल्पना आपल्याला नाही, असं देखील अनिल परब म्हणाले. दोन दिवसांपूर्वी ईडीने परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं.

या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना चौकशीसाठी मी ईडी कार्यालयात जात असल्याचं सांगितलं. “ईडीचे दुसरे समन्स मिळालं आहे, माझ्या मुलीची, शिवसेना प्रमुखाची शपथ मी चुकीचे काम केलेलं नाही. आज चौकशीला जात आहे. मला कशासाठी बोलावलं हे माहिती नाही, तिथे गेल्यावर कळेल कशासाठी बोलावलं. मी चौकशीला जात आहे, जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तर देईन. माझ्याकडून ईडीला संपूर्ण सहकार्य करीन,” असं अनिल परब म्हणाले.

इतरांबद्दल बोलणार नाही

ईडीने मला आज चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे मी चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. हे मला नक्की माहीत आहे, असं ते म्हणाले. इतर शिवसेना नेत्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी माझ्या बाबतीत बोलत आहेत. इतरांबद्दल बोलणार नाही, असं परब यांनी सांगितलं.

दुसरं समन्स

शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांना ईडीने समन्स बजवून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अनिल परब हे ईडी कार्यालयात जात आहेत. पोलिसांनीही ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

First Published on: September 28, 2021 11:03 AM
Exit mobile version