‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात, लोकांच्या मृत्यूपेक्षा यांना प्रसिद्धीची चिंता’

‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात, लोकांच्या मृत्यूपेक्षा यांना प्रसिद्धीची चिंता’

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियावर कोट्यवधी खर्च करण्यावरुन अतुल भातखळकर यांची ठाकरे सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार खर्च करणार आहे. याची जबाबदारी ही बाह्य एजन्सीवर असणार आहे. यावरुन आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. लोक कोरोनामुळे मरत असतानादेखील या निर्लज्ज आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे, अशी खरमरीत टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखल यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही…मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

याशिवाय, त्यांनी व्हिडिओतून कठोर शब्दांत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारवर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. “उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात…यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता. जनता, डॉक्टर, नर्सेस पैसे आणि पगाराविना तडफडत आहेत. लोक कोरोनामुळे मरत असतानादेखील या निलाजरा आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एजन्सी तात्काळ रद्द करा आणि याची पूर्ण चौकशी करा,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी व्हिडिओतून केली आहे.

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकार ६ कोटी खर्च करणार

अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ५ कोटी ९८ लाख २ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाह्य कंपनी नियुक्त करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी अजित पवार यांचं ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघणार. व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असणार आहे. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाईल.


हेही वाचा – अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकार ६ कोटी खर्च करणार


 

First Published on: May 13, 2021 12:25 PM
Exit mobile version