मुलायम यांच्या विधानामुळे युती प्रभावित होईल – आठवले

मुलायम यांच्या विधानामुळे युती प्रभावित होईल – आठवले

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत केलेल्या मोदी आणि भाजपच्या स्तुतीचा थेट परिणाम समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीवर होईल. पर्यायाने उत्तरप्रदेशात भाजपच्या जागा वाढतील असे राजकीय भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. स्व. माई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी नागपूर भेटीवर आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले आठवले

“मुलायम सिंह जुने-जाणते राजकीय नेते आहेत. ते फार विचारपूर्वक बोलत यांच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. उत्तरप्रदेशात मुलायम सिंहांना मानणारा मोठा वर्ग आहे. अखिलेश सिंह यांनी आपल्या वडिलांना बाजुला सारून पक्षाची सुत्रे स्वतःच्या हाती घेतल्यामुळे उत्तरप्रदेशात नाराजी पसरली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला नुकसान झाले. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे जुने कार्यकर्ते सपा-बसपा युतीमुळे नाराज आहेत. मुलायम सिंह यांच्या विधानामुळे त्यांच्या नाराजीला हवा मिळाली असून त्याचे परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसतील असे आठवले यांनी सांगितले. मुलायम सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची केलेली स्तुती योग्य असून त्यांच्या विधानातून देशातील जनतेचे मतप्रदर्शन झाले आहे. याची फायदा भाजपला उत्तरप्रदेशात होईल.” – रामदास आठवले

दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवी

एनडीए घडक पक्षांच्या युतीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, “भाजप आणि शिवसेनेने मतभेदांना तिलांजली देऊन एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी आठवले यांनी स्वतःसाठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेची मागणी केली. तसेच या जागेच्या मोबदल्यात भाजपच्या कोट्यातून आपण शिवसेनेला दुसरी जागा मिळवून देऊ.”

आंबेडकरांनी एनडीएत यावे

सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होत नसते हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. एआयएमआयएम सारख्या हिंदू विरोधी पक्षासोबत राहुन त्यांच्या पदरी पराभवच पडणार आहे. मला संधी साधू म्हणण्याऐवजी त्यांनी व्यावहारिक विचार करून भाजपसोबत येण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी आरपीआयचे लोकसभेत ९ खासदार होते आज गोळाबेरीज शून्य आहे. त्यामुळे आंबेडकरांनी एनडीएमध्ये यावे आम्ही त्यांना लोकसभेत पाठवू असे आवाहन आठवले यांनी केले.

First Published on: February 14, 2019 5:24 PM
Exit mobile version