अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?; केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं

अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?; केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं

मुंबईः राज्यसभा निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांना चांगलाच डिमांड आलाय. अपक्ष आमदारांच्या मतांवरच सहाव्या जागेवरच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. त्याच संदर्भात विधान मंडळ कार्यालयानं निवडणूक आयोगाला विचारला केली होती, त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानंही स्पष्टीकरण दिलंय. अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, त्या पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांनी केलेले मत दाखवणे आवश्यक आहे का?, अशी विचारणा विधान मंडळ कार्यालयाने केली असता निवडणूक आयोगानं त्याला उत्तर दिलंय.

खरं तर अपक्ष आमदारांच्या मतदानाबद्दल आयोगानं महत्त्वाची माहिती दिली. अपक्ष आमदार कोणालाही मत दाखवून मतदान करू शकत नाहीत, तसे केल्यास त्यांचे मत बाद ठरवले जाईल, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांच्या आमदारांना त्यांच्या प्रतिनिधीलाच दाखवून करावे लागते आणि तसे न केल्यास पक्षाचा व्हिप झुगारून अन्य उमेदवाराला मत दिल्यास ते बाद ठरते, असा नियम असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं.

दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही, असे खात्रीलायकरीत्या समजते. यापूर्वी 2018 साली उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे मुख्यार अन्सारी आणि समाजवादी पक्षाचे हरिओम यादव यांनाही तुरुंगातून मतदान करण्यास अलाहाबाद हायकोर्टानं नकार दिला होता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शुक्रवारी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मतं कमी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे, मात्र उत्तर प्रदेशमधील यापूर्वीची केस पाहता देशमुख आणि मलिक यांना मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. यासंदर्भात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिलीय. देशमुख आणि मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान मंडळ कार्यालयाला सांगितल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलंय.


हेही वाचाः एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा

First Published on: June 9, 2022 10:49 AM
Exit mobile version