शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!

शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलताना महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणाले. एकीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना प्रसाद लाड यांच्याकडूनही चुकीची माहिती पसरवली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाने ट्वीट करत भाजपाच्या आमदारांना इतिहासाचे धडे देण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा – नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते, सुषमा अंधारेंचं खळबळजनक वक्तव्य

भाजपाचे आमदार प्रसाद लाड स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलत होते. यावेळी त्यांनी महाराजांविषयी चुकीची माहिती दिली. “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला,’ अशी माहिती प्रसाद लाड यांना पुरवली. त्यानंतर, लागलीच त्यांनी आपल्या वाक्याची सारवासारव करत ‘महाराजाचं बालपण रायगडावर म्हणजे कोकणात गेलं,’ असं म्हणाले. ‘रायगडावरच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि तेथून सुरुवात झाली,’ असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – राज्यपालांची बेछूट वक्तव्ये बनतायत भाजपाची डोकेदुखी!

राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.


राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर केला. आधी त्यांनी समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?, असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी राज्यपालांवर सर्वत्र टीका झाली होती. ते प्रकरण शमत नाही तोवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली. तेव्हापासून राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी करण्यात येतेय. एवढंच नव्हे तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीच माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर नेहमीच निशाणा साधला जातोय.

हेही वाचा – शिवरायांचा उद्योजकीय वारसा

First Published on: December 4, 2022 10:05 AM
Exit mobile version