ई-संजीवनीचा सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांना लाभ

ई-संजीवनीचा सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांना लाभ

कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत ६००० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. नागरीकांच्या सोईसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडी देखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत देखील ओपीडी सुरु असणार आहे. ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल अ‍ॅप चार महिन्यांपूर्वी बनवण्यात आले आहे.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कोणत्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत ६०७२ जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे.

ई-संजीवनी ओपीडी अ‍ॅप

मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते. डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

First Published on: October 18, 2020 3:11 PM
Exit mobile version