PMC बँक-HDIL संदर्भात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

PMC बँक-HDIL संदर्भात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

पीएमसी बँक आणि एचडीआयएल या दोघांमधील कर्ज वाटप आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी सध्या ईडीचा तपास सुरु आहे. त्या तपासा अंतर्गत काही संशयास्पद व्यवहार वर्षा राऊत यांच्या खात्यात झाल्याची माहिती सक्तवसुली संचालनालय (ईडी)ला मिळाली असून त्याबाबतचा पुढील तपास करण्यासाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. मात्र, ‘मला किंवा माझ्या पत्नीला अद्याप ईडीची नोटीस’, आलेली नाही. त्यामुळे अधिक माहिती घेऊनच बोलेन अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

यापूर्वी पाठवण्यात आल्या होत्या दोन नोटीसा 

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत वर्षा राऊत यांना दोन नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तर पहिल्या नोटीसीनंतर राऊत यांनी कायदेशीर सल्ला घेतल्याचे देखील समजते. यापूर्वीही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक त्यांचा मुलगा विहंग आणि पूर्वेश सरनाईक, तसेच माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची अडीशे कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. एकूणच संयज राऊत यांच्या पत्नीला आलेल्या नोटीसी नंतर विरोधकांनी हे सूडाचे राजकारण सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘कर नाही त्याला डर कशाला? जर संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी कोणतेही चुकीचे आर्थिक कृत्य केले नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. भाजप आमदारांची अडीश कोटींची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. मग, यामध्ये राजकारण कसले?’, असा सवाल भातखळकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला.

२९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

वर्षा राऊत यांना मंगळवार, २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तरी अद्याप नेमके कारण काय आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. संजय राऊत यांनी आपल्याला ईडीची कोणतीही नोटीस न मिळाल्याचा दावा केल्याने काही वेळात याबाबत ते भूमिका स्पष्ट करतील.


हेही वाचा – काँग्रेस म्हणते…शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये!


 

First Published on: December 27, 2020 6:29 PM
Exit mobile version