वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक, पावणेपाच लाखांचा ऑनलाईन गंडा!

वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक, पावणेपाच लाखांचा ऑनलाईन गंडा!

प्रातिनिधीक फोटो

केवायसी अपडेट करण्याच्या नावाने एका वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. सुमारे पावणेपाच लाख रुपयांना गंडा घालण्यात आला असून ही रक्कम ज्या बँक खात्यात वळविण्यात आली आहे, त्या खात्यातील व्यवहार करण्यास पोलिसांनी बंदी आणली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या भामट्याचा आता स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी शोध घेत आहेत.

यातील तक्रारदार डॉ. मुरारी सुरेश नानावटी (६७) हे अंधेरी परिसरात राहत असून त्यांचे अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात बेंझर नावाचे एक नर्सिग होम आहे. त्यांचे एका खाजगी बँकेत चालू खाते तसेच स्वतच्या नावाने एक क्रेडिट आहे. अनेकदा ते पेटीएम अकाऊंटमधून त्यांचे विद्युतसह इतर बिले भरतात. ६ जुलैला दुपारी दोन वाजता त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज केला होता. त्यात त्यांचा पेटीएमचा केवायसीची मुदत संपली आहे, केवायसी अपडेट करण्यासाठी त्यांना एका अ‍ॅपची लिंक पाठविली होती. मात्र कामात व्यस्त असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना एका व्यक्तीने फोन करुन त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगून पुन्हा एक लिंक पाठविली होती.

या व्यक्तीने त्यांना क्रेडिट कार्डवरुन एक रुपये जमा करण्यास सांगितले, त्यांनी क्रेडिट कार्डवरुन एक रुपया जमा केला. त्यानंतर त्यांना दोन मॅसेज आले होते, त्यांच्या बँक खात्यासह के्रडिट कार्डवरुन सुमारे पावणेपाच लाख रुपये इतर बँक खात्यात वळविण्यात आले होते. या मॅसेजनंतर त्यांना त्यांची फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता, प्राथमिक तपासात ही रक्कम एक बँक खात्यात जमा झाली होती, या बँक खात्यातील व्यवहार आता पोलिसांकडून रोखण्यात आले असून तशी माहिती संबंधित बँकेला कळविण्यात आली आहे. ते खाते कोणाचे आहे, या खात्यात अन्य काही पैसे जमा झाले होते का, ते खाते त्याने कधी उघडले होते याचा आता पोलीस तपास सुरु आहे.


हे ही वाचा – एनकाऊन्टर विकास दुबेचा पण चर्चा मात्र रोहित शेट्टीची!


First Published on: July 10, 2020 7:09 PM
Exit mobile version