कामत कुटुंबियांच्या भेटीने मुंबई काँग्रेस अध्यक्षांची ‘धडधड’ वाढली

कामत कुटुंबियांच्या भेटीने मुंबई काँग्रेस अध्यक्षांची ‘धडधड’ वाढली

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम

एरव्ही पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे समोर आणत सत्ताधाऱ्यांची धडधड वाढवणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची सध्या धडधड वाढली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईत जाहीर सभा झाली. या मुंबई दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते गुरुदास यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून दिवंगत गुरुदास कामत यांच्या कुटुंबाचा विचार होऊ शकतो का? अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. यामुळेच या मतदारसंघावर डोळा असलेले मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम जोरदार कामाला लागले आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, माजी मंत्री सुरेश शेट्टी हे लढण्यास इच्छुक आहेत. मात्र या मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी पक्षश्रेठीकडे केली असून, तुर्तास तरी या मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा हे अजून ठरले नसल्याने निरुपम अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला सुरुवात

अजून या मतदारसंघातुन तिकीट कुणाला मिळेल याचा निर्णय झाला नसतानाही संजय निरुपम मात्र या मतदारसंघात कामाला लागले आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी निरुपम यांनी सुरू केल्या असून, मतदारसंघातील विविध कार्यक्रमाना देखील निरुपम आवर्जून उपस्थित राहत असल्याचे पहायला मिळत आहे. महाशिवरात्रीला तर संजय निरुपम आपल्या कार्यकर्त्यांसह जोगेश्वरीमध्ये उपस्थित होते. तसेच मतदारसंघात निरुपम यांचे मोठं मोठे फलक देखील पहायला मिळत आहेत.

मुंबईतल्या नेत्यांचा मात्र निरुपम यांना विरोध

दरम्यान संजय निरुपम हे जरी या मतदारसंघातून इच्छुक असले तरी मुंबईतील निरुपम विरोधकानी संजय निरुपम यांच्या ऐवजी दुसऱ्या कुणाच्या तरी नावाचा विचार व्हावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे काँग्रेसचे मुंबईतील दिगगज संजय निरुपम यांच्या नावाला विरोध करत असताना दुसरीकडे कामत गट देखील निरुपम यांना विरोध करताना दिसत आहे. दरम्यान याबाबत या मतदारसघातील काही स्थानिक कार्यकर्त्यांशी आपलं महानगरने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील निरुपम यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत कामत साहेबांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. तर काही कार्यकर्त्यानी आता नवीन उमेदवारास पक्षाने संधी द्यावी अशी मागणी केली.


वाचा – सेना-भाजपाची युती ‘संधीसाधू’ – संजय निरुपम

वाचा – मेट्रोने लावली मुंबईची वाट – संजय निरुपम


 

First Published on: March 7, 2019 2:15 PM
Exit mobile version