बिहारमधील दुर्घटनेत जखमी झालेले मराठी कुटुंब विशेष विमानने पुण्यात, मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत

बिहारमधील दुर्घटनेत जखमी झालेले मराठी कुटुंब विशेष विमानने पुण्यात, मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत

मुंबई : बिहारमध्ये एका घरात गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात एका कुटुंबातील चौघे जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबई किंवा पुण्यात हलविण्याची गरज होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने स्वखर्चाने दोन एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली व दोन जखमी बालकांना पुण्यामध्ये आणले. दोघांवरही पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि.सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहारच्या पाटणा येथे वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २च्या सुमारास घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही जण मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी एअर अॅम्ब्युलन्ससाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी संबंधित कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे नातेवाईक हतबल झाले. शिवाय, याचा होणारा लाखोंचा खर्च कसा करायचा, ही चिंता होतीच.

हेही वाचा – विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला आणि सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी, नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय एअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते उपलब्ध होऊ शकली नाही.

त्यामुळे मागेपुढे न पाहाता, एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून दोन एअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. जखमींपैकी ११ वर्षांच्या मुलास घेऊन एक विमान आज सकाळी ६ वाजता पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या १२ वर्षांच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११ वाजता दाखल झाले. दोन्ही जखमींना पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले आहे.

आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना जखमींच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटण्यास घेऊन जाणार असल्याचे रुग्णाच्या आईने सांगितले.

हेही वाचा – तीन मोदी… अन् हर्ष गोयंका यांचे मजेशीर ट्वीट

First Published on: July 17, 2022 6:28 PM
Exit mobile version