Jitendra Awhad : चालते व्हा महाराष्ट्रातून…; शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून सत्ताधाऱ्यांना टोला

Jitendra Awhad : चालते व्हा महाराष्ट्रातून…; शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून सत्ताधाऱ्यांना टोला

 

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. आज २ जून आहे. जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख माहीत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. चालते व्हा महाराष्ट्रातून… कारण हा शिवरायांचा अपमान आहे. इतिहासाचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचाः350 वर्षांपूर्वीचा राज्याभिषेक सोहळा त्या काळातील अभूतपूर्व आणि विशेष अध्याय – नरेंद्र मोदी

शिंदे-फडणवीस सरकारकडून रायगडावर शिवाची महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्या निमित्त दिमखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व हजारो शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते.

हेही वाचाःVIDEO : छत्रपती शिवाजी महारांजाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारणार, देवेंद्र फडणवीसांचे शिवराज्याभिषेक सोहळ्यात आश्वासन

या कार्यक्रमावर आमदार डॉ. आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून टीका केली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. उत्तरेतून आलेले गागा भट यांनी हा राज्याभिषेक केला. तुम्ही शुद्र आहात. तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, असे येथील सनातनी मनूवाद्यांनी शिवाजी महाराजांना हात जोडून सांगितले होते. शिवराज्याभिषेक  ६ जून १६७४ रोजी झाला. आज २ जून आहे. कोणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली की आज शिवराज्याभिषेकाचा उत्सव साजरा करायचा, असा टोला आमदार डॉ. आव्हाड यांनी लगावला.

हेही वाचाःRaigad : ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह; राज ठाकरेंनी केलं ध्वजारोहण

तुम्हाला जर शिवराज्याभिषेकाची तारीख माहीत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा काहीच अधिकार नाही. चालते व्हा येथून… हा शिवरायांचा अपमान आहे. इतिहासाचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे जे जे रायगडावर सोहळ्यासाठी गेले आहेत त्यांना महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असे आवाहनही आमदार डॉ. आव्हाड यांनी केले.

तुम्ही इतिहासाची तोडमोड करत आहात. हे सर्व कशासाठी सुरु आहे. तुम्हाला सनातन धर्माचा प्रचार करायचा आहे. तुम्हीच होतात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे. तुम्ही इतिहासाचे वाटोळे करायला निघाला आहात, असा टोलाही आमदार डॉ. आव्हाड यांनी लगावला.

शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे माघारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर आलेला असताना तो सोडून सुनील तटकरे माघारी आले. खाली उतरल्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून येथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

 

First Published on: June 2, 2023 7:47 PM
Exit mobile version