एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा

एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए घोटाळ्यात मृत भावाच्या फोटोचा वापर केला असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुरावेच सादर केले. यामध्ये महाराष्ट्र प्राधिकरण महामंडळाकडे संजय अंधारे या मुळ सदनिकाधारकाच्या करारावर किशोरी पणेडकर यांचा भाऊ सुनिल कदम यांचा फोटो आहे. तर, भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयात सादर केलेल्या कागदपत्रावर संजय अंधारे यांचा भलताच फोटो आहे. शिवाय, संजय अंधारे यांच्या सह्याही बदलल्या असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर घाबरत असल्यानेच त्या चौकशीला जात नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

हेही वाचा – हा ‘स्नेह’ इतरवेळी कुठे अदृश्य होतो? वानखेडेवरील सर्वपक्षीय स्नेहभोजनावर शिवसेनेचा हल्लाबोल

एसआरए घोटाळ्याप्रकरणात किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर आणि त्यांच्या क्रिश कंपनीवर आरोप केले आहे. क्रिश कंपनीच्या माध्यमातून एसआरए प्रकल्पात घोटाळा झाल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. विविध एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी घोटाळे केले आहेत. याप्रकरणी विविध ठिकाणी चौकशीही सुरू असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. एसआरए प्रकल्पात घोटाळा झाला असल्याची माहिती मी एक वर्षांपूर्वीच ठाकरे सरकारला दिली होती. त्यासंदर्भात वांद्र्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. एसआरएकडे पुरावेही सादर केले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून दबाव आल्याने किशोरी पेडणेकरांची चौकशी झाली नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.


मरिन लाईन्स पोलीस ठाण्यातही याप्रकरणी तक्रार दाखल आहे. तसंच, उच्च न्यायालयातही मी जनहित याचिका दाखल केली आहे. एसआरएनेही तपास सुरू केला आहे. एसआएरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना मी नुकतंच भेटलो. त्यांनी तपास सुरू केला असल्याचं सांगितलं आहे. अर्ध्या डझन ठिकाणी अनेक प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. कोविडमधील कमाई, बेनामी संपत्ती याची चौकशी मुंबई गुन्हे आर्थिक विभागाने केली पाहिजे, अशी आमची मागणी असं किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा – एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज दादर पोलीस ठाण्यात जाऊन किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पेडणेकरांना मंगळवार, १ नोव्हेंबरला चौकशीला बोलावले आहे. आजही पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्या चौकशीला गेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारच्या चौकशीला त्या जातात हे पाहावं लागेल. तसंच, किशोरी पेडणेकर यांनी कोणता घोटाळा केलाच नसेल तर त्या घाबरत आहेत, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

किशोरी पेडणेकरांवर आरोप कोणते?

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गोमाता जनता एसआरए प्रकल्पात कमी किंमतीमध्ये घरं विकण्याचा आरोप करण्यात आला आहे. पेडणेकरांनी काही गाळे आणि फ्लॅट्स कमी किमतीमध्ये विकत देण्याचे आश्वासन दिले होते. याच गोमाता जनता एसआरए इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील घर स्वताचे असल्याचे पेडणेकरांनी प्रतित्रापत्रात २०१७ मध्ये म्हटलं आहे.

तसेच दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हॉटसअप चॅट समोर आल्यामुळे पेडणेकर यांचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशीसुद्धा केली होती. यानंतर त्यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या हजर राहिल्या नाही. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत.

 

First Published on: October 30, 2022 12:13 PM
Exit mobile version