आरोपीच्या पत्नीची केवायसी ठरली दुवा; व्यावसायिकाने सांगितला अपहरणाचा थरार?

आरोपीच्या पत्नीची केवायसी ठरली दुवा; व्यावसायिकाने सांगितला अपहरणाचा थरार?

नाशिक : झटपट श्रीमांतीच्या बहाण्याने ट्रेडिंग व्यावसायिकाचे अपहरण करणार्‍यांचा शोध नाशिक शहर पोलिसांनी एका आरोपीच्या पत्नीच्या केवायसीवरुन लागला. पोलिसांनी चार आरोपींचा मुसक्या आवळल्या असून, त्यांच्या ताब्यातून ३ लाख ४० हजार रुपये जप्त केले आहेत. हा मुद्देमाल सोमवारी (दि.९) पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते नरेंद्र पवार यांना देण्यात आला. पोलिसांच्या सहकार्यामुळे पैसे परत मिळाल्याने आनंद झाल्याचे नरेंद्र पवार यांनी दै. आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

ट्रेडिंग व्यावसायिक नरेंद्र पवार यांची ट्रेडिंग व्यवसायातून आर्थिक भरभराट झाल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यांच्यासाठी चार तासांच्या अपहरणाचा थरार काळजाचा ठोका चुकवणारा होता. ट्रेडिंग व्यवसाय सुरु करण्याच्या बहाण्याने आरोपींनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता. पवार कामानिमित्त कोरोनाकाळात औरंगाबादमध्ये राहत होते. त्यावेळी जालना येथील टोळक्याने पवार यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली होती. त्यावेळी आरोपी सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले होते. पवार यांना त्यांच्या संशयास्पद हालचालींची जाणीव झाली होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने पवार हे कुटुंबियांसह सातपूरमध्ये वास्तव्य करु लागले.

२९ जून २०२२ रोजी आरोपींनी पवार यांच्या संपर्क साधला. त्यांना भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील आयटीआय सर्कलवर बोलवले. त्यानुसार पवार हे २९ जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता ऑडी कार घेवून गेले. मात्र, आरोपींनी त्यांना दुसर्‍या चौकात नेले. या ठिकाणी पवार हे कारमधून उतरताच आरोपींना त्यांना बळजबरीने दुसर्‍या कारमध्ये बसविले. त्यांना सातपूर-अंबड लिंक रोडमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने घोटी परिसरात नेले. या ठिकाणी त्यांची ऑडी कारसुद्धा आरोपींनी आणली होती. आरोपींनी त्यांच्याकडे सुरुवातीला पाच कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, पवार यांनी माझ्याकडे एक कोटी रुपयेसुद्धा नसल्याचे सांगितले. त्यावेळी एका आरोपीने ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याने ओळखीच्या लोकांकडून २० लाख रुपये घेऊन येण्यास सांगत धमकावण्यात आले. पवार यांनी एका आरोपीचा आवाज ओळखला. पवार यांनी भितीपोटी एका मित्राला कॉल करत २० लाख रुपयांची मागणी करत पैसे सिडको बसस्टॅण्ड परिसरात घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित व्यक्ती २० लाख रूपये घेऊन आला. ते पैसे आरोपींना मिळाले. त्यातून आरोपींचे आणखी आमिष वाढले. आरोपींनी पवार यांना आणखी ५० लाख रुपये मागितले. त्यावेळी पवार यांनी इतके पैसे नसल्याचे सांगितले. तरीही आरोपींना दुसर्‍या मित्राकडे पैसे मागण्यास सांगितले.

नरेंद्र पवार यांनी शक्कल लढवत पवार मित्राच्या घरी चला, तुम्हा पैसे देतो असे सांगून स्वत:च्या घरी आणले. मात्र, आरोपींना काहीच समजले नाही. त्यांनी पत्नीशी कॉलवर बोलत दारात बोलवले. पत्नीला पतीच्या संशयास्पद बोलणे व हालचाली पाहून अपहरण झाल्याची जाणीव झाली. पवार यांच्या पत्नीने फ्लॅटचे दार उघडताच पटकन घरात प्रवेश करत सुटका केली. त्यानंतर पवार यांनी गॅलरीत येत आरडाओरड करण्यास सुरुवात करताच नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. त्यानंतर पवार यांनी सातपूर पोलिसत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली.

First Published on: January 10, 2023 2:06 PM
Exit mobile version