आघाडीत येण्याऐवजी मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी!

आघाडीत येण्याऐवजी मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत येण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी, अशी व्युहरचना राष्ट्रवादी-काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आखली आहे. आघाडीत येण्याऐवजी मनसेने स्वतंत्रपणे मुंबई, ठाणे, पुणे नाशिक या शहरी भागात किमान ५० ते ६० जागा लढवाव्यात. या ठिकाणी आघाडीचा मनसेला पाठिंबा राहिल आणि राज्यात उर्वरित ठिकाणी मनसेने आघाडीला मदत करावी, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेत निवडणूक मनसेने लढवली नाही, त्यामुळे आघाडीला कोणताही फायदा झाला नव्हता, असे मतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केले. सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपाध्यक्ष अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. ही बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाली. राज्याच्या शहरी भागात मनसेचा प्रभाव असून युवा वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहे. मुख्य म्हणजे राज ठाकरे यांच्यासारखा राज्यातील अव्वल वक्ता मनसेकडे आहे. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता. एकहाती लाखोंची सभा गाजवण्याची कला राज यांच्याकडे आहे. मात्र सभा गाजवूनही त्याचे मतात रूपांतर होत नसल्याने राज हे नाराज आहेत, शिवाय मनसेचा बाहेरून पाठिंबा घेणारी काँग्रेस आघाडीही संभ्रमित झाली आहे.

लोकसभा निवडणुवेळी राज यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करताना देशाचे लक्ष वेधून घेतले होते. आक्रमक भाषणाच्या जोडीला व्हिडिओची जोड देत राज यांनी भाजपचा पोलखोल केला होता, मात्र तरीही लोकांनी आघाडीऐवजी भाजप आणि शिवसेना युतीच्या बाजूने मोठा कौल दिला. निकालानंतर राज यांनी अनपेक्षित अशीच प्रतिक्रिया व्यक्त करत ईव्हीएमवर ठपका ठेवला होता.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने व्यूहरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने स्वत: निवडणुकीत उतरून भाजप आणि शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे करायचे. सोमवारच्या या बैठकीत यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय लौकरच जाहीर करण्याचे ठरल्याचे समजते.

ईव्हीएमला विरोध करणारे राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमने मतदान झाल्यास निवडणूक लढवण्यास राज ठाकरे फारसे उत्सुक नसल्याचे समजते. देशपातळीवर ईव्हीएमविरोधी आंदोलन उभे राहावे, यासाठी राज ठाकरे जोरदार प्रयत्नशील आहेत. राज मंगळवारी कोलकात्याला जाणार असून तिथे त्यांचा 3 दिवस मुक्काम असेल. गुरुवारी ते मुंबईत परत येतील. ते बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना भेटणार आहेत. ममता बनर्जी यांच्याप्रमाणे आणखी प्रमुख राजकीय नेत्यांनाही ते भेटणार आहेत. राज्यात ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतील.

आता नाही, लौकरच कळेल
या बैठकीत काय झाले याविषयी मी आताच काही सांगू शकत नाही. लौकरच ते तुम्हाला कळेल. माझ्या घरी ही बैठक झाली असून त्याचा तपशील आतच सांगणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राज ४ ऑगस्टला पुण्यात करणार घोषणा
येत्या ४ ऑगस्टला राज ठाकरे पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने पक्षाचे काय धोरण असेल याची घोषणा करतील. यावेळी ते आघाडीसोबत जायचे की नाही किंवा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतील, असे कळते.

First Published on: July 30, 2019 5:56 AM
Exit mobile version