भाजपात प्रवेशासाठी रांग लागलीये – फडणवीस

भाजपात प्रवेशासाठी रांग लागलीये – फडणवीस

निरंजन डावखरे यांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या मुंबई कार्यालयामध्ये डावखरे यांचा स्वागत समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभावेळी सांगितले की, ३० वर्षांपूर्वी भाजपा हा फार छोटा पक्ष होता. परंतु, आता पक्षात येण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. हळूहळू इतरांचीही नावे लवकर जाहीर होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना भाजपात नेहमी संधी मिळते, असेही ते म्हणाले.

दोन महिने शिल्लक असताना आमदारकीचा राजीनामा
पक्षांतर्गत चालणाऱ्या राजकारणाला वैतागून निरंजन डावखरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २०१२ मध्ये कोकण पदवीधर मतदार संघामधून ते विधान परिषदेत निवडून आले होते. त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यांच्या आमदारीकीचा हा कार्यकाळ पूर्ण व्हायला फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक होता.

कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे निरंजन सुद्धा कित्येक दिवसांपासून आमच्या संपर्कात होते. निरंजन यांची राष्ट्रीय पक्षात सहभागी होऊन केंद्रीय राजकारणात येण्याची इच्छा होती. त्याचबरोबर आम्हालाही निरंजन सोबत काम करण्याची इच्छा होती, म्हणून निरंजन यांना भाजपामध्ये सहभागी करुन घेतले.” त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरेंना उमेदवारी देण्याचे घोषित केले.

मोदींच्या विकास धोरणांवर विश्वास
निरंजन यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठी राजकारणी आहेत. परंतु, मोदींचे विकास धोरण त्यांना आवडले आहे. मोदींनी आखलेली विकास कामे भविष्यात लवकरच पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे.

First Published on: May 24, 2018 9:28 AM
Exit mobile version